ब्रिटनचा कोरोना संशयित गोमेकॉत दाखल

0
530
पणजी:इटली मधून जाऊन आलेल्या एका ब्रिटिश पर्यटकामध्ये कोरोनाची संशयित लक्षणे दिसू लागल्यामुळे त्याला बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज मध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी खास बनवलेल्या कक्षात दाखल करण्यात आले आहे.त्याच्यावर उपचार सुरु असून त्याचे नमूने तपासणीसाठी मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
गोव्याला कोरोना पासून भीती नाही.इतर ठिकाणी कोरोनाच्या भीतीमुळे न जाणारे देशी,विदेशी पर्यटक गोव्यात मोठ्या संख्येने येतील,असा विश्वास कालच बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केला होता.त्याला चोवीस तास उलटायच्या आतच ब्रिटनहुन आलेल्या एका पर्यटकामध्ये कोरोनाची संशयित लक्षणे दिसल्याने त्याला गोमेकॉमधील कोरोनाच्या रुग्णांसाठी सुरु केलेल्या विशेष कक्षात दाखल करावे लागले आहे.
गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिलेल्या माहिती नुसार संशयित रुग्ण हा ब्रिटनचा नागरिक आहे.नुकताच तो इटली येथे प्रवास करून आला होता.कालच तो गोव्यात आला आहे.आज पहाटे साडे चार वाजता त्याच्यात कोरोनाची संशयित लक्षणे दिसू लागल्याने त्याला एका खाजगी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले होते.मात्र त्यांनी त्याला गोमेकॉमध्ये पाठवले. त्याच्यावर उपचार सुरु असून त्याचे नमूने तपासणीसाठी मुंबई येथे पाठवण्यात आले आहेत.
या ब्रिटनच्या पर्यटकाशिवाय एक जर्मन आणि एक मलेशियन पर्यटक देखील कोरोनाची संशयित लक्षणे आढळल्याने गोमेकॉमध्ये दाखल आहेत.हे दोन्ही रुग्ण परवा गोमेकॉ मध्ये दाखल झाले आहेत.त्यांचेही नमूने मुंबई येथे पाठवण्यात आले असून अजुन त्यांचा अहवाल आलेला नाही.विशेष म्हणजे तिन्ही रुग्ण हे कोरोनाचा फैलाव झालेल्या देशांमधून प्रवास करून आलेले आहेत.
गोव्यात यापूर्वी 3 संशयीत रुग्ण सापडले होते.मात्र त्यांचा अहवाल नकारात्म आला होता.कोरोनाचा फैलाव झालेल्या देशात जाऊन आलेले पर्यटक गोव्यात असतील तर त्यांच्यावर नजर ठेवून त्यांना योग्य ते उपचार उपलब्ध करून देण्याचे आव्हान सरकारला पेलावे लागणार आहे.
गोव्यात कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी उच्चस्तरीय कृती दल स्थापन करण्यात आले आहे.दाबोळी विमानतळावर येणाऱ्या पर्यटकांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी केली जात आहे.त्याशिवाय गोमेकॉत 30 खाटांचा विशेष कक्ष सुरु करण्यात आला आहे.त्याशिवाय साखळी सरकारी रुग्णालय आणि मडगाव येथील टीबी रुग्णालयात दहा खाटांचे स्वतंत्र कक्ष सुरु केले जाणार आहेत.त्याच बरोबर खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनासाठी स्वतंत्र विभाग असावा यासाठी पावले उचलली जात आहेत,असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले आहे.