बोरीत ट्रक उलटून 4 वीज कर्मचारी ठार

0
1005

गोवा खबर : बोरी सर्कलच्या जवळील उतरणीवर वीज खांब घेऊन जाणारा ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात वीज खात्याचे 4 कर्मचारी जागीच ठार झाले; तर इतर 3 कर्मचारी जखमी झाले.

हा अपघात इतका भीषण होता की अपघातस्थळी तिघा कर्मचार्‍यांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.

गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास बोरी येथील सर्कलच्या उतरणीवर हा अपघात झाला. विजेचे खांब आणण्यासाठी कर्मचारी वीज खात्याचा ट्रक घेऊन सकाळी मडगाव येथे गेले होते. ट्रकमध्ये 9 कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. बोरीच्या सर्कलच्या वळणावर सावर्डेचा रस्ता जुळतो त्याच ठिकाणी समोरून येणार्‍या दुचाकीला वाचवताना चालक प्रदोष नाईक यांचा ट्रकवरील ताबा सुटून ट्रक पलटी झाला. या अपघातात अवजड असे विजेचे खांब अंगावर पडल्याने तीन कर्मचारी जागीच ठार झाले. एका कर्मचार्‍याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

अपघाताचे वृत्त समजताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये धाव घेतली. जखमींवर केल्या जाणार्‍या उपचाराची माहिती त्यांनी घेतली.

बोरी येथिल दुर्देवी अपघात : कामत

दरम्यान, बोरी येथे वीज खात्याचा खांब घेऊन जात असलेला ट्रक कलंडुन तिन कामगारांना दुर्देवी मरण आले हे ऐकुन  धक्काच बसला. सर्व मृतांच्या कुटूंबियांप्रती  संवेदन व्यक्त करतो व जखमी झालेल्यांला लवकर बरे करावे अशी देवाकडे प्रार्थना करतो,अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी बोरी अपघातावर व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यानी या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी  मागणी करत असल्याचे सांगून कामत म्हणाले, हा अपघात कसा घडला व त्याला कारणे कोणती हे शोधुन, जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणे गरजेचे आहे.
सर्व कामगारांना सुरक्षा कवच व सामग्री पुरवणे सरकारची जबाबदारी आहे,असे कामत म्हणाले.