बेपर्वा मुख्यमंत्र्यांना भाजपने बदलावे, अन्यथा आरोग्य मंत्र्यानी राजीनामा द्यावा: गोवा फॉरवर्डची मागणी

0
673
 गोवा खबर:गोमंतकीयांच्या आरोग्याबद्दल बेपर्वा असलेल्या आणि कुठलीही माहिती नसलेल्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत याना एकतर भाजपने पदावरून बदलावे किंवा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.
 गोव्यात ऐन पावसाळ्यात सीमा खुल्या करून मुख्यमंत्र्यांनी गोवेकरांना कोरोनाच्या खाईत लोटल्याचा आरोप त्यांनी केला.
वास्कोत कोरोनाचा जो सामाजिक फैलाव झाला त्याला मुख्यमंत्रीच कारणीभूत असून गोव्याच्या सीमा सर्वांसाठी खुल्या केल्याचा हा परिणाम आहे. यामुळेच कोरोना प्रभावित भागातून गोव्यात पर्यटक आले याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले आहे. सध्या मांगोर हिल या एका भागातच 46 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. यामुळे गोवा सुरक्षित असून गोव्यात असलेले रुग्ण बाहेरच्या राज्यातून आलेले या मुख्यमंत्र्यांच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे. हा कोरोना मेड इन चायना नसून मांगोर हिलजवळ गर्दीत ग्रेड सेपरेट सारखी उदघाटने करून स्वतः बोलावून घेतलेला होममेड असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.
रेड झोन मधून येणाऱ्या पर्यटकाना वेळीच अडवून न ठेवल्याचा हा परिणाम आहे,असे सांगून सरदेसाई म्हणाले,जून आणि जुलै या दोन महिन्यात फैलाव अधिक होणार असल्याने गोव्याच्या सीमा सर्वांना खुल्या करण्याचा आत्मघातकी निर्णय घेण्याऐवजी केवळ गोवेकरांना आणि अत्यावश्यक वस्तूच गोव्यात आणण्यासाठी परवानगी द्या.
सीमेवर प्रत्येक माणसाची तपासणी करा, तपासणीचा निकाल येईपर्यंत त्यांना एकाच जागी ठेवा, त्यातून कुणी निगेटिव्ह असल्यास तो गोमंतकीय असल्यास त्याला घरी आणि बिगर गोमंतकीय असल्यास सशुल्क कवॉरंटीन करून ठेवा अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.
दुबईहुन गोव्यात परत आलेल्या गोवेकरांना दाबोळी विमानतळावर जी वागणूक मिळाली तीही उद्वेगजनक असून गरोदर  महिलेलाही जो त्रास देण्यात आला तो माणुसकीला शोभणारा नव्हता. वरून या कृतीला आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी सहमती दिली आहे ते पहिल्यास या अधिकाऱ्यांना एक तर गृह मंत्रालयाचे शिष्टाचार काय ते माहीत नसावेत किंवा ते मुद्दामहून तसे वागत असावेत असा आरोप सरदेसाई यांनी केला आहे. असे प्रकार यापुढे टाळण्यासाठी सरकारने लवकरात लवकर गोवा केंद्रित शिष्टाचार तयार करावेत अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.