बेताळभाटी गँगरेपमधील ईश्वरची माहीती देणाऱ्यास पोलिस देणार बक्षीस

0
1258
गोवा खबर:दक्षिण गोव्यातील बेताळभाटी येथील गँगरेप प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मध्यप्रदेश मध्ये खून, बलात्कार अशा अनेक गुन्ह्यात समावेश असलेल्या अट्टल गुन्हेगार ईश्वर मकवाना याने सोमवारी पणजी येथील टीबी हॉस्पिटलमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन  पलायन केले.पोलिसांकडून त्याचा शोध सुरु असून अद्याप तरी तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.आज पोलिसांनी त्याची माहीती देणाऱ्यास बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले आहे.त्याच बरोबर ईश्वरने दाढी,मिशी काढली तर तो कसा दिसेल याचे संभाव्य फोटो जाहीर केले आहेत.
बेताळभाटी गँगरेप प्रकरणी ईश्वर आणि त्याच्या 2 साथीदारां विरोधात जुलै महिन्यात पोलिसांनी 292 पानी आरोपपत्र दाखल केले आहे.मध्यप्रदेश मध्ये अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये तेथील पोलिसांसाठी वॉन्टेड असलेल्या ईश्वरने आपले साथीदार संजीव पाल आणि राम भारीया यांच्या सोबतीने २४ मे रोजी दक्षिण गोव्यातील बेताळभाटी कीनाऱ्यावर 20 वर्षीय युवतीवर गँगरेप केला होता, या आरोपींनी त्या त्याचे मोबाइलवर चित्रण केले होते.
याच चित्रणाच्या जोरावर त्यांनी त्या युगुलाकडे 1 लाख रुपयांची खंडणी मागितली होती.खंडणी दिली नाही तर ते चित्रण व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
यासंदर्भात कोलवा पोलीस स्थानकावर तक्रार नोंदविल्यानंतर फातोर्डा पोलीस स्थानकाचे निरीक्षक नवलेश देसाई यांनी सापळा रचून ईश्वरसह राम भारीया व संजीव पाल या तिघांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू झाली असता, मध्यप्रदेशातही निर्जनस्थळी येणाऱ्या प्रेमी युगुलांना गाठून आरोपी ईश्वरने कित्येक युवतींवर बलात्कार केला होता. त्याशिवाय अशाच एका प्रकरणात त्याने दोघांचा खूनही केला होता. मध्यप्रदेश पोलिसांचा ससेमिरा सुरू झाल्यानंतर संशयितांनी गोव्यात आश्रय घेतला होता. मात्र गोव्यातही त्यांनी तशाचप्रकारचा गुन्हा केल्याने त्या तिघांना अटक करण्यात आली होती. या तिन्ही संशयितांविरोधात मडगावच्या सत्र न्यायालयात सध्या सुनावणी चालू होती.पोलिसांनी जलद तपास करून जुलै महिन्यात तिघां विरोधात 55 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवुन 292 पानी आरोपपत्र दाखल केले आहे.
ईश्वर हा कोलवाळे येथील तुरुंगात असून तेथूनच त्याला काही दिवसांपूर्वी त्याची प्रकृती बिघडल्याने  पणजी येथील क्षय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. या रुग्णालयात उपचार घेत असतानाच सोमवारी पहाटे त्याने पलायन केल्याचे उघड झाले. यासंदर्भात कोलवाळच्या एस्कॉर्ट सेलने पणजी पोलीस स्थानकात तक्रार दिली असून या फरार आरोपीच्या शोधात पोलीस आहेत.