बेकायदा हाॅटेल्स व होम स्टे यांना सरकारने प्रोत्साहन दिल्यास पर्यटन उद्योग पुर्णपणे नष्ट होणार : दिगंबर कामत

0
342
गोवा खबर: गोवा सरकारने बेकायदा हाॅटेल्स व होम स्टे यांना प्रोत्साहन दिल्यास पर्यटन उद्योग पुर्णपणे नष्ट होणार असल्याचा इशारा देत, गोवा पर्यटन खात्याने अधिकृत नोंदणी केलेल्या व्यावसायीकांनाच परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्याकडे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केलीआहे.

 सरकारने बेकायदा व्यवसाय करणारे दलाल व तसेच अनधिकृत एजंट यांच्यावर कारवाई करुन पर्यटन क्षेत्रात पारदर्शकता आणणे गरजेचे आहे असे  कामत यांनी म्हटले आहे.
गोव्याच्या पर्यटन मंत्र्यानीच हल्लीच गोव्यात सुमारे १.६० कोटी पर्यटक बेकायदा वास्तव्य करुन गेल्याचे मान्य केल्याने, आज पर्यटन व्यवसायावर सरकारचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे,याकडे कामत यांनी लक्ष वेधले.
गोव्यातील अधिकृत नोंदणी करुन सरकारला सर्व शुल्क व कर भरणारे हाॅटेल व्यावसायीक अशा बेकायदा धंद्यामुळे त्रस्त आहेत व त्यांचा व्यवसाय बंद पडलेला आहे. सरकारला बेकायदा हाॅटेल्स व होम स्टे चालविणाऱ्यांकडुन कसलाच महसूल मिळत नाही,असे सांगून कामत म्हणाले,८ एप्रिलच्या  मंत्रीमंडळ बैठकीत कोरोना लाॅकडाऊन काळात सुमारे ६७५ पर्यटक  गोव्यात असल्याची माहिती अधिकृतपणे मांडण्यात आली होती. त्यात केवळ ८६ देशी पर्यटक होते.  सदर बैठकीत गोव्यात ५८९ विदेशी पर्यटक असल्याची माहिती देण्यात आली होती व त्या सर्वाना त्यांच्या मायदेशी पाठविण्यासाठी सरकार पाऊले उचलणार असे मुख्यमंत्र्यानी सांगीतले होते.
परंतु, लाॅकडाऊन काळात गोव्यातुन सुमारे ४९ विमानातून अंदाजे ९५०० पर्यटक आपल्या मायदेशी परत गेल्याचे गोवा विमानतळ प्राधिकरणाने  जाहिर केले आहे. त्यामुळे ९००० विदेशी पर्यटक गोव्यात अनधिकृत व बेकायदा निवासात वास्तव्य करुन होते हे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच सरकारी आकड्यापेक्षा बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांची संख्या पंधरा पटीनी जास्त असल्याचे उघड होत आहे,असे कामत म्हणाले.

हे केवळ हिमनगाचे टोक असुन, गोव्यात ८० टक्के देशी व २० टक्के विदेशी पर्यटक प्रत्येक वर्षी येतात असे आकडेवारी सांगते. केवळ विदेशी पर्यटकांच्या आकडेवारीत उघड होत असलेली विसंगती पाहिल्यास अनधिकृतपणे वास्तव्यास असणाऱ्या देशी पर्यटकांचा आकडा कितीतरी पटिने जास्त असल्याचे स्पष्ट आहे. गोव्यात एकुण ७० टक्के निवास व्यवस्था धंदा बेकायदा चालतो हे म्हणण्यास वरिल आकडेवारी वाव देते असा दावा  कामत यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यानी बेकायदा पर्यटन व्यवसाय करणारे हाॅटेल्स, होम स्टे, दलाल व बेकायदा एजंट यांच्यावर कडक कारवाई करावी व पर्यटन उद्योगात पुर्ण पारदर्शकता आणावी अशी मागणी  कामत यांनी केली आहे.