बिग बी आणि तलैवा ठरणार यंदाच्या सुवर्णमहोत्सवी इफ्फीचे आकर्षण

0
485
 गोवा खबर:यंदा होणाऱ्या सुवर्णमहोत्सवी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला दोन सुपरस्टार्स हजेरी लावून महोत्सवाची रंगत वाढवणार आहेत. बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन व तमिळ फिल्म इंडस्ट्रीचे मेगास्टार तलैवा अर्थात रजनीकांत या दोन महानायकांच्या उपस्थितीने यंदाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यादगार होणार आहे.
 अमिताभ बच्चन उद्घाटक व दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांच्यासारख्या सिने जगताच्या महानायकांच्या उपस्थितीमुळे यंदाचा इफ्फी नक्कीच सुवर्णमयी ठरणार आहे.
रजनीकांत यांना ‘आयकॉन ऑफ ग्लोडन ज्युबिली’ या पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. भारतीय सिनेमा जगतात मोलाचे योगदान दिल्याबद्दल या पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात येणार आहे.

 सुपरस्टार रजनीकांत चार दशकांहून अधिक काळ जगभरातील लोकांच्या मनावर राज्य करीत आहेत. बॉलीवूड ते दक्षिणतील चित्रपटसृष्टी पर्यंत शानदार प्रवास करणाऱ्या सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरूवात 1975 साली ‘अपूर्व रागंगल’ या तमिळ चित्रपटापासून केली. रजनीकांत यांनी विविध भाषांमधल्या 170 चित्रपटांमध्ये काम केले आहे. रजनीकांत यांना 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2016मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 2014 साली 45 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रजनीकांत यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय व्यक्ती म्हणून भारतीय चित्रपट शतकवर्षपूर्ती पुरस्कार देण्यात आला होता.
दरवर्षी आंचिममध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांना समर्पित विभागाचा समावेश असतो. परंपरेनुसार यावर्षी सुवर्णमहोत्सवी चित्रपट महोत्सवात अमिताभ बच्चन यांच्या सहा सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे प्रदर्शन एका वेगळ्या विभागाच्या माध्यमातून बच्चन यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात येणार आहे. ही बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना त्यांच्या निवडक चित्रपटांचा आस्वाद घेता यावा, यासाठी ‘रिट्रोस्पेक्टीव्ह ऑफ बच्चन’ या विभागातंर्गत चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. बच्चन हे दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते असून ‘पा’ या त्यांच्या चित्रपटाने विभागाचा शुभारंभ होणार आहे. याशिवाय शोले, दीवार, ब्लॅक, पिकू आणि बदला या चित्रपटांचे प्रदर्शन या विभागाद्वारे करण्यात येणार आहे.