बालकांना सांभाळण्याची जबाबदारी सर्व समाजाची : नरेंद्र सावईकर

0
1325
 
 
 गोवा खबर:  सामान्यतः पोषक आहार, वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची मनाली जाते. परंतु मूल जन्मास आल्यानंतर त्याचे योग्य पालन-पोषण करण्याची  जबाबदारी बाळाचे आई-वडील, कुटुंब, समाज, राज्य व राष्ट्र या सर्वांचीच आहे, प्रतिपादन दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांनी आज केले.
राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त सामुदायिक आहार व पोषण विस्तारीत एकक, गोवा द्वारा आयोजित कार्यशाळेचे उदघाटन सावईकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
७२ वर्षांनंतरही बालपोषण या विषयाशी आपण झगडत आहोत, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. गोवा राज्याचा आढावा घेताना ते म्हणाले कि गोवा राज्याचे जागतिक स्तरावरील स्थानाचा अभिमान बाळगताना बाल पोषण आहार हे देखील आपल्यासमोरील आव्हान आहे. भावी पिढीचे पोषण व्यवस्थित व्हावे, हि आपली जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.
आरोग्य क्षेत्रात आपला देश खूप मागे आहे. सगळ्यांनी मिळून जबाबदारी घेतल्यास परिस्थिती नक्की बदलेले, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कृषी भवन येथे आयोजित या कार्यशाळेमध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला व बाल विकासच्या मुख्य सेविका, शिक्षक वर्ग, आरोग्य विभाग अधिकारी, स्वयंसेवी संस्था अशा सर्व स्तरातून सुमारे ५० व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.
यावेळी मंचावर गोवा कॉलेज ऑफ होम सायन्सेसच्या सहायक प्राध्यापक वर्ष नाईक, महिला व बाळ विकास मंत्रालय, राज्य सरकारच्या सह संचालक दीपाली नाईक तसेच सामुदायिक आहार व पोषण विस्तारीत एकक, गोव्याच्या अधिकारी संगिता राणे व नीता राणे उपस्थित होत्या.