बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारीपासून

0
635

गोवा खबर: गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २८ फेब्रुवारी, २०१९ ते २६ मार्च, २०१९ दरम्यान इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे.

इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती www.gbshse.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सर्व विभागांतील (सामान्य/सीडब्ल्युएसएन/व्यावसायिक/एनएसक्यूएफ) परीक्षा सकाळी १० वाजता सुरू होईल. सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या ठराविक परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरू होण्याच्या ३० मिनिटे अगोदर हजर राहावे. प्रत्येक विषयातील परीक्षा सुरू झाल्याच्या ३० मिनिटांनंतर उशीराने येणारे विद्यार्थी परीक्षा देण्यास अपात्र ठरतील.

विद्यार्थ्यांनी कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण आपल्यासोबत आणू नये. तसेच प्रवेश कार्ड व मुख्य उत्तर पत्रिकेवर छापलेल्या सूचनांचे सक्त पालन करावे असे कळविण्यात आले आहे.

इयत्ता बारावी परीक्षेसाठी १७ केंद्रे निवडण्यात आली आहेत, ज्यात कुजिरा या नवीन केंद्राचा समावेश आहे. या परीक्षेला ८५७७ मुले व ९३१६ मुली मिळून एकूण १७८९३ विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे.

केंद्रनिहाय आसन व्यवस्था आणि आयोजक व पर्यवेक्षकांची नावे व संपर्क क्रमांक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. कोणतीही समस्या असल्यास संबंधित केंद्राच्या आयोजक/पर्यवेक्षकाशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.