बारावीची परीक्षा रद्द

0
169
गोवा खबर : कोविडचा उद्रेक होत असल्यामुळे केंद्र सरकारने सीबीएसईची बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारनेही शालान्त मंडळामार्फत घेतली जाणारी बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल कशा पद्धतीने तयार करावा, त्यासाठीची निकष आज परपत्रका द्वारे जाहिर केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
कोविड महामारीमुळे कुठलीच जोखीम पत्करायची नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बारावीच्या परीक्षेविषयी सरकारदरबारी दिवसभर व्यापक प्रमाणात चर्चा आणि सल्लामसलत करून परीक्षा रद्द करण्याचे ठरले. त्याच दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सीबीएसईच्या परीक्षा रद्द केल्यासंदर्भातील परिपत्रकही मिळाले आहे. त्यानंतर सरकारने बुधवारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
निकाल कसा तयार केला जाईल, त्यासाठी निकष गोवा शालान्त मंडळ ठरवणार आहे. सीबीएसईच्या निर्णयानंतर शालान्त मंडळ निकष सर्व उच्च माध्यमिक शाळांना कळवणार आहे. दरम्यान, परीक्षा रद्द केल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेली चिंताही संपुष्टात येईल. निकालाच्या बाबतीत योग्य ते निकष स्वीकारून निकाल जाहीर होतील, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने यापूर्वीच दहावीची परीक्षा रद्द केली आहे. दहावीचा निकाल विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांवर आधारीत असेल. त्यासाठीचे निकष आणि पद्धतीबाबत शालान्त मंडळाने यापूर्वीच सर्व विद्यालयांना कळवले आहे.  शालान्त मंडळ कशा पद्धतीने निकाल तयार करावा, त्याविषयी परिपत्रक आज गुरुवारी जारी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
गोवा विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन 
गोवा विद्यापीठाच्या ८ जूनपासून सुरू होणार्‍या ऑनलाईन परीक्षा आता २१ जूनपासून सुरू होणार आहेत. अंतिम वर्षाच्या लेखी परीक्षा १ जुलैपासून, तर एमबीए, एमबीए (एफएस) आणि एमसीएच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा २१ जूनपासून होणार आहेत. या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. सगळ्या प्रलंबित आयएसए ऑनलाईन पद्धतीनेच होणार असल्याचेही गोवा विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.