बाबुश मोन्सेरात कथित बलात्कार प्रकरणातील ती युवती बेपत्ता

0
991
 गोवा खबर: माजी मंत्री आणि पणजीच्या विधानसभा पोट निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार असलेले बाबुश मोन्सेरात यांच्या विरोधात दाखल केल्या गेलेल्या कथित बलात्कार प्रकरणातील पीडीत युवती दक्षिण गोव्यातील एका कॉन्वेंटच्या हॉस्टेलमधून अचानक  गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.  महिला व बाल कल्याण खात्याने याची गंभीर दखल घेत या प्रकरणात तपास करणाऱ्या वेर्णा पोलिसांकडून स्थिती अहवाल मागितला आहे. सध्या वेर्णा पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे.या घटनेमुळे निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेस पक्ष अडचणीत आला आहे.
  पोलीसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणो 28 एप्रिल पासून ती युवती गायब झाली आहे. सदर कॉन्वेंटच्या नन्सनी याबाबत पोलीसस्थानकात तक्रार दिली आहे. त्यात त्या युवतीला कुणीतरी भुलवून  गायब केले असावे असा संशय व्यक्त केला आहे.
माजी शिक्षणमंत्री आतानासियो उर्फ बाबूश मोन्सेरात यांच्यावर 2016 साली त्यांच्या आस्थापनात काम करणाऱ्या एका अल्पवयीन युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. त्या युवतीला गुंगीचे औषध देऊन तिला बेशुद्ध करुन नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणात गोवा पोलिसांच्या महिला विभागाने मोन्सेरात यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केले होते. मागच्या आठवडयात या प्रकरणात आरोप निश्र्चितीपूर्वीची सुनावणी झाल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले होते. यापार्श्वभूमीवर आता या प्रकरणातील पीडित युवतीच गायब झाल्याने या प्रकरणाला एक वेगळे वळण लाभले आहे.
उपलब्ध माहितीप्रमाणो, या कथित बलात्काराच्या प्रकरणानंतर त्या युवतीला अपना घरमध्ये ठेवण्यात आले होते. अपना घरमधून तिला शिक्षणासाठी दक्षिण गोव्यातील एका कॉन्वेंट हॉस्टेलमध्ये ठेवण्यात आले होते. या कॉन्वेंटमध्ये ती फॅशन डिझायनींगचा कोर्स करत असे. 27 एप्रिल रोजी सकाळी ती हॉस्टेलमधून अचानक गायब झाली होती. मात्र रात्री 9च्या सुमारास पुन्हा हॉस्टेलमध्ये परतली होती. 28 एप्रिल रोजी कॉन्वेंटमधील सगळया नन्स रविवारच्या प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेल्या असता त्या युवतीने  आपले सामान भरुन आपण परत अपना घरमध्ये जाते असे सांगून कॉन्वेंटमधून ती बाहेर पडली होती. मात्र नंतर चौकशी केली असता ती अपना घरमध्ये गेलीच नाही अशी माहिती मिळाली होती.
 यानंतर  कॉन्वेंटमधून ती युवती बेपत्ता झाल्याची खबर  पोलीस स्थानकात देण्यात आली होती.  मात्र या संदर्भात रितसर तक्रार देण्यात आली नव्हती. सुमारे आठ दिवस उलटूनही ती परत न आल्याने शेवटी तक्रार नोंदविण्यात आली.
 या संदर्भात माहिती देताना  बायलांचो एकवोट यासंघटनेच्या आवदा व्हिएगश  यांनी ज्या दिवशी या मुलीने हॉस्टेल सोडले त्याच्या आदल्या दिवशी एका इंग्रजी वृत्तपत्रवर बाबुश बलात्कार प्रकरणासंदर्भात  वृत्त आले होते. त्यानंतरच ती मुलगी गायब झाली. कदाचित हे वृत्त वाचून दबावाखाली येऊन तिने पलायन केले की कुणी तरी तिच्यावर दडपण आणून  तिचे अपहरण केले याची सखोल चौकशी होण्याची गरज त्यानी व्यक्त केली.
या प्रकरणात बाल कल्याण समितीनेही लक्ष घातले असून या समितीच्या सदस्यांनी वेर्णा पोलिसांशी संपर्क साधून तपास कुठे पोहोचला आहे याची चौकशी केली.