बाबुश मॉन्सेरात यांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश?

0
764

गोवा खबर: बाबुश मॉन्सेरात यांनी बुधवारी गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष आणि ग्रेटर पणजी पीडीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मॉन्सेरात यांनी पणजीतून पोटनिवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसशी चर्चा सुरू असून काँग्रेसमध्ये प्रवेश करावा की नाही, याविषयी निर्णय होईल, असे मॉन्सेरात यांनी  सांगितले.   

माजी मंत्री मॉन्सेरात यांनी बुधवारी ग्रेटर पणजी पीडीए आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर संध्याकाळी महापालिकेवरील आपल्या गटाचे नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांची ताळगावमधील कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला महापौर उदय मडकईकर, माजी महापौर टोनी रॉड्रिग्स व इतर नगरसेवक उपस्थित होते. गुरुवारी सकाळी पणजीतील कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक होईल, जी मॉन्सेरात यांच्यासाठी शक्ती प्रदर्शनाची बैठकही ठरू शकते.

बाबुश मॉन्सेरात हे २००२ मध्ये  सोमनाथ जुवारकर यांना पराभूत करून युगोडेपच्या उमेदवारीवर ते विधानसभेत आले. त्यानंतर २००४ मध्ये त्यांनी युगोडेप सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या मॉन्सेरात यांनी पर्रीकर यांच्याशी बिनसल्यानंतर २००५ मध्ये भाजप सरकार पाडले आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २००७ मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसची उमेदवारी खिशात ठेवून त्यांनी एेनवेळी युगोडेपची उमेदवारी स्वीकारली. २०१२ मध्ये पुन्हा ते काँग्रेसच्या उमेदवारीवर सांताक्रुझमधून निवडणूक लढले आणि आमदार झाले. २०१५ मध्ये काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून हाकलले. त्या घटनेला आज चार वर्षे झाली आहेत. २०१७ मध्ये त्यांनी युनायटेड गोवन पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष राहिलेले आंतोनियो ऊर्फ टोनी फर्नांडिस यांना सांताक्रुझमधून काँग्रेसची उमेदवारी घ्यायला लावली. ते स्वत: युगोपच्या उमेदवारीवर पणजीतून निवडणूक लढले. पणजीत भाजपच्या उमेदवारांकडून पराभूत झाल्यानंतर जुलै २०१७ मध्ये त्यांनी ‘गोवा फॉरवर्ड’ पक्षात प्रवेश केला.