बदलत्या जीवनशैलीमुळे उदभवणाऱ्या आजारांवर योगाच्या माध्यमातून मात-श्रीपाद नाईक

0
1339
आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवी शंकर यांच्या हस्ते दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय योग परिषदेचे पणजी, गोवा येथे 12 नोव्हेंबर 2018 रोजी उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक, आयुष मंत्रालयाचे सचिव वैदय राजेश कोटेचा आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती

दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय योग परिषदेचे उदघाटन

 

 

गोवा खबर:बदलत्या जीवनशैलीमुळे आज नवनवीन रोग जडत आहेत. अशाप्रकारच्या आजारांचा समर्थपणे मुकाबला करण्याची ताकद योगामध्ये आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार ) श्रीपाद नाईक यांनी केले. जनसामान्यांसाठी योग या विषयावर आधारीत दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उदघाटनाप्रसंगी श्री नाईक बोलत होते. आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवी शंकर, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, अतिरिक्त सचिव डॉ पी के पाठक, आयुष मंत्रालयाचे सल्लागर डॉ डी सी कटोच यांची उदघाटनसोहळ्याप्रसंगी उपस्थिती होती.

दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय योग परिषदेच्या उदघाटनाप्रसंगी पणजी, गोवा येथे 12 नोव्हेंबर 2018 रोजी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक

नियमित योगाभ्यास केल्यास आरोग्य, भावनिक आणि मानसिक संतुलन स्थिर राहते. परदेशातही आज योगाचा प्रसार झाला आहे. अमेरिकेत आज दोन कोटी लोक योग करतात. अमेरिकी लष्कराने प्रशिक्षणासाठी योगाभ्यास निवडला आहे. इंग्लंड, युरोपीय देशांनीही योगाला प्राधान्य दिले आहे. अनेक आजारांवर पर्यायी उपचारपद्धती म्हणून योग लोकप्रिय होत आहे, असे श्रीपाद नाईक म्हणाले.

सध्या योग फार लोकप्रिय पद्धती आहे. असंसर्गजन्य रोगांवर योग प्रभावी ठरत आहे. योग आता काही लोक किंवा संस्थांपुरताच मर्यादीत राहू नये तर ती जनचळवळ ठरावी याहेतूनच या परिषदेचे आयोजन केले असल्याचं ते म्हणाले. जनसामान्यांसाठी योग ही या आंतरराष्ट्रीय परिषदेची संकल्पना त्यामुळेच निवडली आहे, असे सांगत त्यांनी परिषदेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय आयुष मंत्रालय विविध योजनांच्या माध्यमातून भारतीय उपचारपद्धतींचा प्रसार करत आहे. ‘राष्ट्रीय आयुष मिशन’ या महत्वाकांक्षी योजनेचा यात समावेश आहे. त्यामुळे योग केवळ भारतातच नाही तर जगभरातल्या घराघरांमध्ये पोहचेल, असे ते म्हणाले.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी व्हीडिओ संदेशाच्या माध्यमातून योग परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या. श्री श्री रवीशंकर आणि आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनीही याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले.