‘बडे अब्बू’, ’काजरो’सह 4 कोकणी सिनेमे इफ्फीत

0
547
गोवा खबर:मांडवी तिरावर 20 नोव्हेंबरपासून आयोजीत होत असलेल्या सुवर्णमहोत्सवी इफ्फीमध्ये गोव्यातील चार कोंकणी सिनेमांची ’गोवा प्रीमिअर विभागा’मध्ये निवड करण्यात आली आहे. यामध्ये झारखंड राष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमासह चार पुरस्कारांची बेगमी करणार्‍या ‘बडे अब्बू’, मामि चित्रपट महोत्सवामध्ये ‘इंडियन स्टोरीज्’ विभागामध्ये निवड झालेला ‘काजरो’ या दोन्ही बहुचर्चित सिनेमांसह ‘दुलू’ आणि ‘रणसांवट’ या सिनेमांचाही समावेश आहे.
इफ्फी गोव्यात स्थिरावल्यानंतर पाच वर्षांपूर्वी तत्कालीन माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘गोवा विभागा’ची घोषणा करण्यात आली होती. या विभागामध्ये गोव्यातील निर्मात्यांचे, व्यावसायिक स्तरावर अद्याप प्रदर्शित न झालेल्या सिनेमांची विशेष निवड करण्यात येत असते. यामध्ये यावर्षासाठी शांती दिलीप बोरकर यांच्या दिशा क्रिएशन’ निर्मित ‘बडे अब्बू’, राजेश पेडणेकर यांच्या ‘द गोवन स्टुडिओ’ निर्मित ‘काजरो’ या राज्यात आणि राज्याबाहेरही चर्चेचा केंद्रबिंदू राहिलेल्या यावर्षीच्या दोन आशयघन कोकणी सिनेमांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ‘रणसांवट’ आणि  ‘ए. आर. टी.’निर्मित ‘दुलू’ या दोन सिनेमांचाही यात समावेश आहे. यावर्षी सदर विभागासाठी एकूण 10 सिनेमांच्या प्रवेशिका आल्या होत्या, त्यातील चार सिनेमांची निवड करण्यात आली.
तर लघुपट, माहितीपट विभागात आलेल्या पाच प्रवेशिकांतून ‘125 इयर्स तियात्र’ या तियात्राचा इतिहास विशद करणार्‍या माहितीपटाची आणि ‘व्हाय? किद्याक?’ या दोन लघुपटांची निवड करण्यात आली आहे. या विशेष विभागातील सिनेमाचे परिक्षण ज्येष्ठ सिनेसमीक्षक अनंत विजय, दिग्दर्शक कामख्या नारायण सिंह, टिव्ही अभिनेते अशोक फळदेसाई यांनी केले.