बंदी असताना खवळलेल्या समुद्रात मासेमारी करणे ठरतेय जीवघेणी;20 जण बचावले, एकाचा बळी

0
1173
गोवा खबर:31 जुलै पर्यंत मासेमारी बंदी असताना देखील खवळलेल्या समुद्रात जाऊन मासेमारी करणे जीवावर बेतणारे ठरत आहे.गेल्या दोन दिवसात बायणा किनाऱ्यावर मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या होड्या उलटून झालेल्या दुर्घटनांमध्ये 20 मच्छीमारांना वाचवण्यात यश आले असले तरी एका मच्छीमाराला आपला जीव गमवावा लागला आहे.
बायणा किनाऱ्यावरुन होड्यामधून मासेमारीसाठी बाहेर पडलेल्या मच्छीमारांपैकी सुरेश तांडेल (33 – बायणा) या मच्छीमाराचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही घटना घडली. सोबतच्या दोघा मच्छीमारांना  खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलेले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.शुक्रवारी अशाच प्रकारची घटना घडली होती मात्र त्यातील सर्व मच्छीमारांना वाचवण्यात दृष्टीच्या जीव रक्षकांना यश मिळाले होते.
शनिवारी पहाटे बायणातील मच्छीमारांचा दहा जणांचा गट यांत्रिक होडी घेऊन मासेमारीसाठी गेला होता. परतीच्या वाटेवर असताना  समुद्र खवळलेला असल्याने  होडीवर नियंत्रण ठेवणे त्यांना कठीण झाले.   ते किनाऱ्याच्या जवळ येण्यास यशस्वी ठरले मात्र एका लाटेच्या तडाख्याने सर्व मच्छीमार पुन्हा समुद्रात फेकले गेले. स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी मच्छीमारांना वाचवण्यासाठी  धाव घेतली.  तिघांना अत्यवस्थ स्थितीत जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र सुरेश तांडेल याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मच्छीमार मुन्ना जयस्वाल (37) व पुतीया चलवादी (45) यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.
फॉर्मेलीनच्या दहशतीमुळे मासळी आणि मासळी मार्केटकडे पाठ फिरविलेल्या गोव्यातील मत्स्यपेमींना आता 1 ऑगस्टची प्रतीक्षा आहे. गोव्यातील मत्स्यप्रेमींना मच्छिमारी ट्रॉलरमधून येणाऱ्या मासळीची प्रतीक्षा आहे. मागील 15 दिवस गोव्यातील मासळी खवय्यांनी मासळीकडे पाठ फिरविली आहे.बाजारपेठेत स्थानिक मासळी   उपलब्ध करून फायदा कमावण्यासाठी समुद्र खवळलेला असताना देखील मासेमारी साठी जाणे मच्छीमारांच्या जीवावर बेतणारे ठरत आहे.
फॉर्मेलिनमुळे मासळीची मोठी धास्ती सध्या गोमंतकीयांनी घेतली आहे. 12 जुलै रोजी मडगाव घाऊक मार्केटमध्ये फॉर्मेलिनचा प्रकार उघडकीस आला होता. मडगाव मार्केटमध्ये धाड मारलेल्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रथम मासळीमध्ये फॉर्मेलिन असल्याचे जाहीर केले होते त्यानंतर संध्याकाळी परमीसीबल लिमीटमध्ये फॉर्मेलिन असल्याचे सांगून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. त्यामुळे त्या दिवसापासून मासे खवय्यांनी मासळी संदर्भात घेतलेली धास्ती अद्याप कमी झालेली नाही.
फॉर्मेलिनच्या धास्तीमुळे हॉटेल व्यवसायावरही  मोठा परिणाम झाला आहे. विधानसभेत खुद्द हॉटेलमालक असलेले उपसभापती मायकल लोबो यांनी हा प्रकार कथन केला आहे. हॉटेलमध्ये मासळी उपलब्ध असली तरी ग्राहक मासे मागत नसल्याचा फटका मासळी विक्रेत्यांना बसला आहे.  लोकांनाही मासे खाणे कमी केले आहे. अंडी, गावठी मासळी, खेकडे व भाजीपाला यावरच आता गोव्यातील लोकांचे जेवण अवलंबून आहे.
गेले पंधरा मासळी शिवाय तडफडलेल्या लोकांना आता प्रतीक्षा आहे ती 1 ऑगस्टची. राज्यात मच्छीमारी बंदी काळ 31 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. 1 ऑगस्टला मच्छीमारी ट्रॉलर समुद्रात जातील व त्यानंतर गोव्यात ताजी मासळी उपलब्ध होणार आहे. ट्रॉलरही समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास सज्ज आहेत.