बंजी जंपिंग बनणार गोव्याची नवीन ओळख

0
880
 गोवा खबर:रमणीय समुद्र किनारे,सुरुची बने,चर्च, मंदिरे ही आता पर्यंत गोव्याची ओळख होती.त्यासाठी देश विदेशातील लाखो पर्यटक गोव्यात येत असतात. आता उत्तर गोव्यातील मये येथे सुरु झालेल्या बंजी जंपिंगच्या थरारामुळे गोव्याला नवीन ओळख मिळणार आहे.
या या मया या हे गाणे बरेच प्रसिद्ध आहे.गोव्यात पर्यटकांना बोलावताना या गाण्याची धुन वाजवली जाते.आता मये गावात प्रसिद्ध मये तलावाच्या काठावर सुरु झालेल्या बंजी जंपिंगचा थरार अनुभवायचा असेल तर त्याच गाण्यातील मये गावाला भेट द्यावी लागणार आहे.
सरकारने मये तलावाचे सुशोभीकरण करताना तलावाच्या काठावर बंजी जंपिग सुरु करून पर्यटकांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

पणजीपासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या मये गावात हिरव्यागार डोंगरांच्या मधोमध बसलेल्या  तलावाच्या काठावर हा नवीन उपक्रम मंगळवार पासून सुरु झाला आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत,पर्यटन मंत्री बाबू आजगावकर आणि विधानसभा सभापती राजेश पाटणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचे उद्धाटन करण्यात आले.
तब्बल 170 फुट ऊंचीचा प्लेटफॉर्म यासाठी उभरण्यात आला आहे.15 मजली इमारती एवढा हा प्लेटफार्म आहे. एका लिफ्ट मधून टेरेसवर जावे लागते.40 सेकंदात लिफ्ट वरती पोचते. तेथे तलावाच्या दिशेने रैंप उभरला असून सभोवती हिरवेगार डोंगर आणि खाली तलावाचे  पाणी, जणू अमझोन मध्ये तर आपण नाही ना असा भास झाल्याशिवाय राहत नाही.
निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या देखरेखे खाली सर्व सुरक्षा मापदंड पूर्ण केल्या नंतर तलावाच्या दिशेने झेपावत जंप मारल्या नंतर निर्माण होणारा थरार निश्चितच रोमांचित करणारा असतो.
भारतात ऋषिकेश नंतर फक्त गोव्यातच बंजी जंपिगची सुविधा आहे.त्यामुळे बंजी जंपिंगचा थरार अनुभवायचा असेल तर खतरों के खिलाड़ी बनून पर्यटकांना गोव्यात यावे लागेल…