फोंडयात 30 रोजी गोमंतक महिला साहित्य संमेलन

0
1221
 गोवा खबर:फोंडा येथील श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेने आयोजित केलेल्या 16 व्या गोमंतक महिला साहित्य संमेलना निमित्त  30 डिसेंबर रोजी फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरमध्ये भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्षपद मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे या भूषविणार आहेत. पुणे येथील साहित्यिका लीना दामले यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
 कला व संस्कृती संचालनालय आणि राजीव गांधी कला मंदिरच्या सहकार्याने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी स्वागताध्यक्ष डॉ. सुस्मिता बखले, कार्याध्यक्ष दीपा मिरींगकर, शारदा ग्रंथप्रसारकच्या अध्यक्ष मेघना सावईकर व मुग्धा बोरकर या उपस्थित होत्या. सकाळी 9 वाजता कलामंदिरच्या परिसरात ग्रंथ दिंडीने संमेलनाला सुरुवात होईल. 9.45 वा. उद्घाटन सोहळा होणार असून त्यात स्मरणिका प्रकाशन व पुस्तक प्रकाशन होणार आहे. म्हापसा येथील उद्योजिका शिवलीला मणेरीकर, ज्येष्ठ साहित्यिका शैला राव यांचा यावेळी गौरव करण्यात येईल. दुपारी 12 वा. होणाऱ्या दुसऱ्या सत्रात ‘नक्षत्रांचे लेणे’ या कार्यक्रमात लीना दामले या दृकश्राव्य माध्यमातून नक्षत्र कथा, अंतराळातील चमत्कार व त्याविषयी कविता सादर करणार आहेत.
 भोजनानंतर होणाऱ्या दुपारच्या सत्रात 2 वा. ‘हम ना तुम्हे बुलायेंगे’ हा सी. रामचंद्र यांचे संगीत व स्मृती जागविणारा दृकश्राव्य कार्यक्रम होणार आहे. केतकी साळकर या कार्यक्रम सादर करणार आहेत. चौथ्या सत्रात दुपारी 3 वा. ‘शतकस्मृती जागविताना’ हा पु. ल. देशपांडे आणि ग. दी. माडगुळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त खास कार्यक्रम होईल. शारदा गंथ प्रसारक संस्थेच्या युवा मंचतर्फे हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. पाचव्या सत्रात दुपारी 3.45 वा. ‘बोल मनस्वी’ हा मनस्वीनी प्रभूणे नायक यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होईल. सायंकाळी 5 वा. संमेलनाचा समारोप सोहळा होईल. साहित्य प्रेमींनी संमेलनाला उपस्थित राहावे, असे आवाहना करण्यात आले आहे.