फोंडयात रविवार १४ रोजी ‘पेज्जाद ६७’ सायकल राईडचे आयोजन ; १८२ सायकलस्वारांचा सहभाग

0
172
गोवा खबर : फोंडा येथील स्लोप्स अँड बेंड्स या सायकलिंग ग्रुपतर्फे ‘पेज्जाद ६७’ सायकल राईडचे आयोजन करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या राईडमध्ये महाराष्ट्र आणि गोव्यातून एकूण १८२ सायकलस्वार सहभागी होणार आहेत.  राईडची सुरवात फार्मागुडी, फोंडा येथील जिव्हीएमच्या श्री सीताराम केरकर विद्या संकुल येथे होईल. याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात स्लोप्स अँड बेंड्स सायकलिंग ग्रुप म्हणतात की फोंडा,अंत्रुज या भागात टेकड्या ,चढ ,उतार आहेत.या स्थलाकृतीला अनुसरून ग्रुपचे नाव सुचले आहे.
सायकलस्वार आपेव्हाळ, भूतखांब, सावाईवेरे कोडर, निरंकल, शिरोडा आणि अडपई या खेड्यातून सायकलिंग करतील. येथून सायकलिंग करताना त्यांना जंगल, टेकड्या, बॅक वॉटर, जैवविविधता यांचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. कोंकणीमध्ये पेज्जादचा अर्थ कठीण आणि शक्तिशाली असा होतो.
 याबाबत बोलताना स्लोप्स अँड बेंड्सचे अजय डोंगरे म्हणाले की सायकलस्वारांच्या सहनशक्ती आणि डोंगर चढण्याचा क्षमतेची चाचणी घेण्यासाठी त्यांना चढ उतार असलेल्या रस्त्याने ६७ किमीची राईड करावी लागेल.
सायकलस्वारांना एकूण ९०० मीटरची चढाई चढावी लागेल. सायकलस्वारांच्या सुरक्षिततेसाठी आमचे कार्यकर्ते राईडच्या मार्गावर त्यांना मार्गदर्शन करतील तसेच गस्त करण्यासाठी वाहेनेही ठेवण्यात आली आहेत. याशिवाय मार्गावर ठराविक ठिकाणी पाणी पिण्यासाठी वॉटर पॉईंट्स ठेवण्यात आले आहेत. याशिवाय सहभागी होणाऱ्यांना नाष्टा आणि दुपारचे जेवण देण्यात येईल. राईड पूर्ण करणाऱ्यांना सुंदर चषक देण्यात येईल.”