फॉर्मेलिनमुळे वाहून गेला अधिवेशनाचा पहिला दिवस

0
978
गोवा खबर: गोमंतकीयांच्या जेवणाचा अविभाज्य घटक असलेल्या माशात फॉर्मेलीन सापडल्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाचे पडसास आज विधासभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उमटले. फॉर्मेलिन सारख्या गंभीर विषयावर विधानसभेत सर्वप्रथम चर्चा करावी या मागणीसाठी आज विरोधी कॉंग्रेसच्या आमदारांनी पाच वेळा सभापतींच्या आसनासमोरील जागेत धाव घेत आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज सुरवातीला चार वेळा तर पाचव्यावेळी उद्यापर्यंत तहकूब करावे लागले.
मडगाव येथील मासळी मार्केटमध्ये अन्न व औषध प्रशासन खात्याने केलेल्या माशांच्या तपासणीत माशांत फॉर्मेलीनचे अंश सापडल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे.संभ्रमात पडलेल्या मत्स्यप्रेमीनी मासळी खरेदी करणे थांबवल्याने मासळी बाजार ओस पडू लागले आहेत.अधिवेशनात विरोधक या प्रश्नावरुन सरकारला घेरणार याची कल्पना आल्याने सरकारने काल याची दखल घेत परराज्यातून आणण्यात येणाऱ्या मासळीवर 15 दिवसांची बंदी घातली आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीला फॉर्मेलिन विषयावर चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसच्या 16 आमदारांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली होती. त्यानुसार त्या प्रस्तावावर चर्चा करावी या मागणीवर कॉंग्रेसचे आमदार ठाम राहिले. विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी इतर विषय़ महत्वाचे आहेत मात्र हा  गोमंतकीयांच्या आरोग्याशी निगडीत असल्याने त्यावर आधी चर्चा करा असा आग्रह धरला. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय़ उपस्थित करण्यासाठी परवानगी दिली असल्याने आणि त्याची नोंद कामकाज वेळापत्रकात केली गेली असल्याने स्थगन प्रस्ताव चर्चेस घेण्याचे नाकारले. त्यामुळे कॉंग्रेसचे आमदार पाच वेळा सभापतींच्या आसनासमोरील हौद्यात आले. त्यामुळे एकूण पाचवेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले.