फिश फेस्टिव्हलच्या नावाने 2 कोटींचा चुराडा

0
929
पणजी:ओखी वादळाच्या तडाख्याने पारंपरिक मच्छीमार त्रस्त असताना मच्छीमार खात्याने जवळपास 2 कोटी रुपये खर्च करून आयोजित केलेला गोवा मेगा एक्वा फिश फेस्टिव्हल फ्लॉप शो ठरला.2 कोटी रुपये खर्च करून देखील 2 हजार रूपयांचा प्रतिसाद तथाकथित एक्वा फिश फेस्टिव्हलला लाभला नाही.
पणजी येथील साग मैदानावर 7 ते 10 डिसेंबर दरम्यान आयोजित केलेल्या गोवा मेगा एक्वा फिश फेस्टिव्हल मधून मच्छीमार खात्याने नेमके काय साध्य केले हा  संशोधनाचा विषय ठरावा.44 स्टॉल कोणासाठी होते?किती स्टॉल भरले होते?त्यातील किती स्टॉलचा मच्छीमारीशी संबंध होतो याची उत्तरे मच्छीमार खात्याने देण्याची गरज आहे.
घाई घाईत भरवलेला हा फेस्टिव्हल म्हणजे निव्वळ लोकांच्या करातून मिळालेल्या सरकारी पैशांचा चुराडा होता,अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.ना धड फिश,ना धड एक्वा अशी फेस्टिव्हलची अवस्था होती.गोवा फॉरवर्डच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे यामुळे स्नेहसंमेलन मात्र झाले. व्हीव्हीआयपी लाउंज मध्ये गोवा फॉरवर्डच्या टॉप टू बॉटमच्या लोकांचा मुक्त संचार होता.मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला असलेली व्हीव्हीआयपी बैठक व्यवस्था करण्यात आली होती मात्र हाताच्या बोटापेक्षाही कमी मंडळी तेथे बसलेली दिसली.
फेस्टिवहल मध्ये प्रवेश करताच सगळा मोकळा मोकळा भाग नजरसे पडत होता.डाव्या बाजूला शेवटचे 4 स्टॉल मच्छीशी संबंधित होते.एक्वेरियम,गद्रे सी फूड आदिंचा त्यात समावेश होता.काही स्टोलवर तर कपडे, आइसक्रीम तर बरेच स्टॉल रिकामे होते.
एक्वेरियम टैंकचे प्रदर्शन तरी लक्षवेधी असेल असे वाटत होते पण कसले काय?तेथे बऱ्याच टैंक मधले मासे शोधून देखील सापडत नव्हते.किती मासे शोभिवंत होते हा आणखी एक संशोधनाचा विषय ठरावा.यापेक्षा एन्टीक म्हार्दोळ मधील एक्वेरियम किती तरी पटीने चांगले आणि विविध प्रजातीचे शोभीवंत दाखवणारे आहे अशी प्रतिक्रिया बरेच जण बोलून दाखवत होते.
फिश फूडचे जेमतेम 2 ते 3 स्टॉल होते.मच्छीमारांसाठी म्हणून त्यात काहीच नव्हते.कलाकारांनी साजरी केलेली कोळीगीते आणि फेस्टिव्हलच्या ठिकाणी लावलेले नुस्तेकान्न आणि मच्छीमारांचे 2 पुतळे,2 चौकोनी साच्यावर टांगलेले रंगीत मासे सोडले तर मासेमारीशी फेस्टिव्हलशी काडीचा संबंध दिसून आला नाही.
या फेस्टिव्हल मधून मच्छीमार फॉरवर्ड गेले की आणखी कोण याची खमंग चर्चा मात्र चांगलीच रंगू लागली आहे.गोवा आणि गोयंकारपण याचा फेस्टिव्हलशी नेमके काय कनेक्शन होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही.मनाला येईल तसे केलेले नियोजन आणि राम भरोसे कारभार यामुळे गोवा मेगा एक्वा फिश फेस्टिव्हल मेगा फ्लॉप शो ठरला.फिश फेस्टिव्हल पेक्षा फायर ब्रिगेडच्या मैदानवर भरलेल्या पणजी चर्चच्या फेस्ताच्या फेरीला लोकांची गर्दी पहायला मिळाली. सरकारी पैशांची उधळपट्टी करून गोवा फॉरवर्ड कसा जाणार असा प्रश्न आता सगळे उपस्थित करू लागले आहेत.