फिल्म्स डिविजनतर्फे आयोजित मुंबई आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाच्या नोंदणीसाठी प्रवेशिका खुल्या

0
944

 

 

मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2018 मध्ये माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन पटांसाठी प्रवेशिका आमंत्रित करण्यात येत आहेत. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या फिल्म्स डिविजनतर्फे या द्वैवार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2018 या काळात मुंबईत हा महोत्सव होणार आहे.

1 सप्टेंबर 2015 ते 31 ऑगस्ट 2017 या कालावधीत निर्मिलेल्या 45 मिनिटांपर्यंतचे माहितीपट आणि लघुपट आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा गटातील प्रवेशासाठी पात्र असतील. ॲनिमेशन पटांसाठी वेळेची मर्यादा नाही.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील प्रवेशासाठी परदेशी नागरिकांसाठी 50 डॉलर्स, तर भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी 1500 रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. सार्क देशांमधल्या चित्रपट निर्मात्यांसाठी प्रत्येक चित्रपटासाठी सवलतीचे 30 डॉलर्सचे प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी 1000 रुपये प्रवेश शुल्क आहे.

प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर 2017 आहे. अधिक माहिती www.miff.on वर उपलब्ध आहे.

पुरस्कार

‘मिफ 2018’ साठी करण्यात आलेल्या बदलांबाबत फिल्म्स डिविजनचे महासंचालक मनीष देसाई यांनी माहिती दिली. 15व्या मिफसाठी पुरस्काराची रोख रक्कम दुप्पट म्हणजे 5 लाख रुपयांवरुन 10 लाख रुपये करण्यात आली आहे. महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटात सर्वोत्तम ठरणाऱ्या माहितीपटाला रोख रकमेसह प्रतिष्ठेचा सुवर्णशंख पुरस्कार देण्यात आला.

आंतरराष्ट्रीय गटात सर्वोत्तम लघुपटाला (45 मिनिटांपर्यंत) आणि सर्वोत्तम ॲनिमेशनपटाला प्रत्येकी 5 लाख रुपये आणि रजत शंख पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

राष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या गटात माहितीपटासाठी, 60 मिनिटांवरील आणि 60 मिनिटांपेक्षा कमी असे दोन विभाग आहेत. दोन्ही विभागांसाठी पुरस्काराचे स्वरुप 5 लाख रुपये आणि रजत शंख असे आहे. सर्वोत्तम लघुपट आणि सर्वोत्तम ॲनिमेशनपटासाठी तीन लाख रुपये आणि रजत शंख असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

प्रमोद पाती विशेष परीक्षक पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटात दिला जाईल. महाराष्ट्र सरकारचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पदार्पणातील सर्वोत्तम दिग्दर्शकाला दिला जाईल. आयडीपीए (भारतीय माहितीपट निर्माता संघ) चषक, रोख रकमेच्या पुरस्कारासह विद्यार्थ्याने केलेल्या सर्वोत्तम चित्रपटाला दिला जाईल. सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग आणि साउंड डिझाइन या क्षेत्रात तांत्रिक पुरस्कार दिले जातील.

स्पर्धा गटातल्या पुरस्कारांचा निर्णय पाच सदस्यांच्या आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाकडून आणि राष्ट्रीय परीक्षक मंडळाकडून घेतला जाईल. आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळात तीन परदेशी नागरिक आणि दोन भारतीय असतील. तर राष्ट्रीय परीक्षक मंडळात दोन परदेशी नागरिक आणि तीन भारतीय असतील.

मिफविषयी

मिफची सुरुवात 1990 मध्ये झाली. माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपटासाठी दक्षिण आशियातला हा सर्वात जुना स्पर्धात्मक महोत्सव आहे. जगभरातल्या माहितीपट निर्मात्यांना भेटण्यासाठी, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी, सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी आणि माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन पटांच्या वितरणासाठी मंच उपलब्ध करुन देणे हा या महोत्सवाचा हेतू आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव एन.के.सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील आयोजक समितीचे मार्गदर्शन महोत्सवाला मिळते. समितीमध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते, माहितीपट निर्माते, समीक्षक, विपणन तज्ज्ञ सदस्य आहेत.