फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक वैफल्यग्रस्त सरकारी कर्मचार्‍यांना धमकावण्याचे प्रकार : दुर्गादास कामत     

0
121

गोवा खबर : फातोर्डाचे माजी आमदार तसेच व्हायब्रंट मडगाव पॅनलचे अध्यक्ष दामोदर नाईक सध्या फातोर्डा फाॅरवर्डच्या उमेदवारांना मिळणार्‍या पाठिंब्यांमुळे वैफल्यग्रस्त बनले असून सध्या त्यांनी सरकारी कर्मचार्‍यांना धमकावण्याचे सत्र अवलंबिले असल्याचा आरोप गोवा फाॅरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केला आहे.

गोवा फाॅरवर्ड पक्ष सरकारी कर्मचार्‍यांच्यामागे ठामपणे उभा राहणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. फोन काॅल संभाषणासह यासंदर्भात राज्य निवडणुक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार केली जाणार आहे तसेच यासंदर्भात तपशील प्रत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांना पाठविण्यात येणार असल्याचे कामत यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपा सरकारने यापूर्वी सरकारी कर्मचार्‍यांची गृह कर्ज योजना बंद केली नंतर पोलीस व अन्य खात्यातील बढत्या रोखून धरल्या  तर आता सरकारी कर्मचार्‍यांना चक्क धमक्या देण्याचे सत्र सुरू आहे. आपल्या पक्षाच्या पॅनेलमधील उमेदवारांना पालिका निवडणुकीत पाठिंबा देऊन मतदान केले नाही तर दूरवर बदल्या करण्याबरोबर अन्य प्रकारच्या धमक्या त्यांच्याकडून दिल्या जात असल्याचे आम्हाला काही सरकारी कर्मचार्‍यांकडून कळाले असून त्यासंदर्भातील ‘काॅल रिकाॅर्डीग’ उपलब्ध असल्याचे कामत यांनी सांगितले.

सरकारी कर्मचारी व एकंदर गोमंतकीय जनता आता भाजपाच्या राजवटीला विटली असून त्यांच्या धमक्यांना भिक न घालता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे कामत यांनी म्हटले आहे.