फर्मागुडी फोंडा येथे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती

0
214

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे फर्मागुडी, फोंडा येथे दि. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार्‍या राज्यपातळीवरील कार्यक्रमात गोव्याच्या जनतेच्या वतीने महान मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली अर्पण करतील.

हा कार्यक्रम माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे बांदोडा ग्रामपंचायत आणि कवळे जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्याप्रमाणे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, रामकृष्ण ढवळीकर, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, सर्व आमदार, माहिती आणि प्रसिद्धी सचिव संजय कुमार, आयएएस, बांदोड्याचे सरपंच, फोंडा नगरपालीकेचे अध्यक्ष  राजेश नाईक, कवळे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ८.४५ वाजता मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यानंतर बालभवनच्या मुलांतर्फे स्वागतगीत होईल तसेच किल्ल्याच्या आवारात पोवाड्यांचे सादरीकरण केले जाईल. त्यानंतर सर्व मान्यवर मुख्य कार्यक्रमासाठी गणपती देवस्थानाच्या प्रांगणात जमतील.

प्रसिद्ध इतिहासकारांचे शिवाजी महाराजांचे जीवन आणि कार्य यांवर बीजभाषण हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल.

दिवसभर चालणार्‍या या सोहळ्यामध्ये कार्यक्रमस्थळी सकाळी ९.०० वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि काळ (१६२७ ते १६८०) या विषयावर छत्रपतींच्या गडकिल्ल्यांवर भर देणारी आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा तसेच माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि कार्य या विषयावर नाट्यप्रवेश स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धांच्या विजेत्यांना रू. १०,०००/-, रू. ७०००/- आणि रू. ५०००/- अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय रोख बक्षीसे देण्यात येतील. त्याशिवाय इतर बक्षीसे आणि स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्रे देण्यात येतील.

त्याच दिवशी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक नाटकाचे सादरीकरण करण्यात येईल. हा वार्षिक सोहळा व्यापकपणे यशस्वी करण्याच्या हेतूने इतर तालुक्यांमध्येही ऐतिहासिक नाटकांचे सादरीकरण होणार आहे असे माहिती आणि  प्रसिद्धी खात्यातर्फे कळविण्यात येत आहे.