फक्त दुसऱ्यांना दोष देणे ही सावंत सरकारची कार्यपद्धती : आम आदमी पक्ष

0
293
गोवा खबर: इतरांना दोष देत बसण्याचा खेळ आता बंद करा आणि आपल्या स्वतःच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यातील प्रशासन कोलमडले आहे, हे स्वीकारा, असा टोला आम आदमी पक्षाचे निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लगावला  लगावला आहे. 
म्हांबरे म्हणाले,80 खात्यांमधील एकही संकेतस्थळ चालत नाही अशी स्थिती अजिबात नाही.  बाहेरून आलेल्या लोकांची कामे लगेच होत आहेत ही सत्यपरिस्थिती आहे. मात्र भूमिपुत्रांना आपली कामे पूर्ण करून घेताना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
 अदानीचे काम व्हावे आणि त्याच्या मार्गातील अडसर दूर व्हावा यासाठी लोकांचा विरोध असूनही रेल्वे मार्गांचे दुपदरीकरण करण्यासाठी सरकार तातडीने व घाईघाईने काम करते, पण स्थानिक गोवेकरांना मदत करण्यासाठी मात्र काहीही करत नाही जे आम्ही नुकतेच कोविडच्या काळात सरकारने परिस्थिती कशी हाताळली त्यावरून बघितले आहे,असे सांगून म्हांबरे म्हणाले,
कोविडच्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकाचा काहीही उपयोग झाला नाही कारण ते चालतच नव्हते. त्याचप्रमाणे रुग्णवाहिका देखील उपलब्ध नव्हती ज्यामुळे लोकांना बरेच पैसे खर्च करून रुग्णांना टॅक्सी करून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी न्यावे लागले होते.
  कोविड रोगाशी लढण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यापेक्षा मुख्यमंत्री लोकांना त्यांच्या हलगर्जीपणा केल्याचे कारण देत दोष देत राहिले आणि लोक हॉस्पिटलमध्ये उशिरा उपचारासाठी येत असल्याने मृत्यूचा दर जास्त असल्याचे थातुरमातुर उत्तर त्यांनी थोपुन दिले,असा आरोप म्हांबरे यांनी केला.
म्हांबरे म्हणाले,अदानींना मदत करण्याच्या दृष्टीने जी कामे सुरू आहेत त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करण्यात सरकारला अजिबात अडचण वा कमतरता भासत नाही पण गोव्यातील लोकांसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. दर्यावर्दींना त्यांच्या पेन्शनचे पैसे देण्यात आलेले नाहीत, लाडली लक्ष्मी योजना डब्यात गेल्यात जमा आहे. वैद्यकीय मदतीसाठी असलेली दीन दयाळ स्वास्थ्य सेवा योजना अडवून ठेवण्यात आली आहे. आता सरकार खासगी हॉस्पिटल्समध्ये उपचारासाठी गोवेकरांना अतिशय लठ्ठ फी आकारून त्रास देत आहे पण त्यासाठी असलेली दीन दयाळ योजना रद्द केली आहे. सरकारी हॉस्पिटल्समध्ये परिस्थिती वाईट आहे कारण गोमेकॉमध्ये रुग्णांना जमिनीवर झोपायला लावण्यात आल्याचे उघड झाले आहे. इएसआय हॉस्पिटलमध्ये खाटा नसल्याने रुग्णांना माघारी पाठविण्यात आल्याचे दिसून आले आहे.
प्रशासन कोलमडले आहे,असे सांगून म्हांबरे म्हणाले,  पोलिसांकडून होत असलेली चौकशी आता न्यायालयांनी स्वतःच्या देखरेखीखाली ठेवली आहे. गोमंतकीय व्यक्तीची जमीन बाहेरच्या व्यक्तीला बनावट सही करून विकण्याच्या मायणा कुडतरी येथील प्रकरण न्यायाधीश शाहीर इस्सान यांनी दिलेल्या आदेशामुळे नवीन वळण घेत असलेले पाहायला मिळत आहे.
आम आदमी पक्ष स्थानिक गोमंतकीय व्यक्तींचे हक्क अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध असून डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा आणि गोमंतकीय जनतेसाठी काम करायला सुरूवात करावी, ना की अदानींसाठी, असे म्हांबरे म्हणाले.
प्रशासनाला योग्य दिशा द्या आणि एकमेकांवर खापर फोडणे वा इतरांना दोष देणे असे प्रकार बंद करा असा सल्ला म्हांबरे यांनी मुख्यमंत्री सावंत यांना दिला आहे.