गोवा खबर:गोव्यात गंभीर बनत चाललेली कचऱ्याची समस्या निकालात काढून गोय नितळ करण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.राज्यात नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्पांची निर्मिती करण्याबरोबरच प्लॅस्टिक बंदी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पर्रिकर यांनी घेतला आहे. येत्या 26 जानेवारीपासून गोव्यात प्लास्टिक बंदी लागू होणार आहे. रस्त्याच्या कडेला  ट्रकांमधून आणून कुणीही कचरा टाकला तर तो ट्रक सरकारी यंत्रणा जप्त करेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी आज पणजीतील पाटो परिसरात उभारण्यात आलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उद्धाटन प्रसंगी बोलताना दिला.  महामार्गाच्या बाजूने आणून टाकला गेलेला कित्येक टन कचरा गेल्या काही महिन्यांत सरकारी यंत्रणांनी गोळा केला आहे. चार हजार दोनशे टन कचरा अशा प्रकारे गोळा झाला आहे. जर हा कचरा उचलला गेला नसता व असाच महामार्गाच्या बाजूने ठेवला गेला असता तर पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली असती, असे सांगत सध्या सुरु असलेल्या प्रकाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. प्लॅस्टिक वापर बंदीचा पहिला टप्पा 26 जानेवारीला सुरू होईल. 30 मे पासून गोव्यात पूर्णपणो प्लॅस्टिक बंदी असेल,याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. गोवा मुक्तीदिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी याचा उल्लेख केला होता. पीव्हीसीआधारित प्लॅस्टिकला आम्ही बंदी लागू करू. स्टार्च आधारित प्लॅस्टीकला प्रोत्साहन देऊ,असे आज पर्रिकर यांनी स्पष्ट केले. प्लॅस्टीकमधून खाण्याचे आणि अन्य खाद्य पदार्थ पॅक करून देण्यावरही बंदी लागू केली जाईल, असे पर्रीकर यांनी सांगत प्लास्टिक वापरणाऱ्यांना एक प्रकारचा इशारा दिला आहे.