प्लाज्मा दानाविषयी जागरूकता निर्माण करा : मुख्यमंत्री

0
434

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविडमुक्त झालेल्या रूग्णांमध्ये प्लाज्मा दानाविषयी जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे अधोरेखित करताना, सर्व कोविड निगा केद्रांमध्ये चांगल्या दर्जाचे जेवण व चांगली स्वच्छता देण्यावर भर दिला. डॉक्टरांची उपलब्धता, रूग्णवाहिका, व्यापलेल्या खाटा, वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट आणि सुरक्षा व्यवस्था याबाबतही अहवाल त्यांनी घेतला.

डॉ. सावंत यांनी आज गोव्यातील सर्व कोविड निगा केंद्रांच्या प्रमुख अधिकार्‍यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वसमावेशक आढावा घेणारी बैठक घेतली. या बैठकीला उत्तर गोवा जिल्हाधिकारी श्रीमती आर मेनका (आयएएस) आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी श्री. अजित रॉय (आयएएस) हे सुद्धा उपस्थित होते.

कोरोनाव्हायरस संसर्गातून मुक्त झालेल्या रूग्णांमध्ये १००० पेक्षा अधिक हे गोवा सरकारच्या विविध सरकारी खात्यांमधील कर्मचारी आहेत, यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या कर्मचार्‍यांना प्लाज्मा दान करण्यास पुढे येण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी संबंधित खात्यांना जिल्हाधिकार्‍यांनी सहकार्य करावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना सतर्क राहण्याचे व रुग्णांची गैरसोय झाल्यास ती त्वरित सोडविण्याचे आवाहन केले. दोन्ही जिल्हाधिकार्‍यांनी आपापल्या जिल्ह्यातील कोविड निगा केंद्रामधील कोविड व्यवस्थापनाविषयीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.

डॉ सावंत यांनी, या वैश्विक महामारीविरूद्धच्या लढाईत लढणार्‍या सर्व अधिकारी घेत असलेल्या अथक प्रयत्नांसाठी त्यांचे आभार मानले व सध्याच्या या संकटकाळावर मात करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.

यावेळी उत्तर गोव्यातील – श्री. संदीप गावडे (कळंगुट रेसिडेन्सी); श्री. लक्ष्मीकांत कुट्टीकर (साई गर्ल्स होस्टेल); श्री. प्रसाद वोविळकर (डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम); श्रीमती शमा आरोंदकर (पणजी रेसिडेन्सी) आणि श्री. प्रविणजय पंडित (केशव सेवा साधना वाठादेव) हे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. तर दक्षिण गोव्याचे श्री. शंकर गावकर (एमपीटी इस्पितळ); श्री. गौरव गांवकर (मडगाव व कोलवा रेसिडेन्सी); श्री. रोजारिओ कार्वाल्हो (इंडोअर स्टेडियम फातोर्डा); श्रीमती जान्वी कालेकर (पीएचसी शिरोडा); श्री. राजेश साखळकर (जीईसी वसतिगृह व मांडवी वसतिगृह) आणि श्री. कौशिक देसाई (आयआयटी गोवा) हे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.