प्रेक्षक आणि निधी मिळवणे हे माहितीपट निर्मात्यांसमोरचे मोठे आव्हान : उषा देशपांडे

0
2105

माहितीपटांसाठी स्वतंत्र वाहिनी असावी : संस्कार देसाई

 

 गोवा खबर:माहितीपटांना प्रेक्षक आणि निधी मिळवणे हे माहितीपट निर्मात्यांसमोरचे सर्वात मोठे आव्हान असून, या समस्येवर उपाय शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी माहिती आयडीपीए म्हणजेच भारतीय माहितीपट निर्माते संगठनेच्या अध्यक्षा उषा देशपांडे यांनी दिली. 49 व्या इफ्फी दरम्यान त्यांनी मिडिया सेंटर इथे आज पत्रकार परिषद घेतली. आयडीपीएचे सरचिटणीस संस्कार देसाई हे देखिल यावेळी उपस्थित होते.

इफ्फीमध्ये 25 ते 27 नोव्हेंबर या काळात होणाऱ्या ओपन फोरम या चर्चासत्र कार्यक्रमाविषयी देशपांडे यांनी माहिती दिली. यंदाच्या ओपन फोरममध्ये, ‘बायोपिकवर दिग्दर्शकाचे मत – बायोपिकमध्ये सत्य आणि कल्पनेचे सहभाग किती?’ , ‘आजचे चित्रपट निर्मिती तंत्रज्ञान महत्वाचा भाग ठरतो आहे का? आणि त्याचा परिणाम’ तसेच ‘स्मार्ट फोनमुळे प्रत्येकालाच चित्रपट निर्मितीचा अनुभव मिळतो आहे का? चित्रपट निर्मिती शिकण्यासाठी हे माध्यम पुरेसे आहे का?’ या तीन संकल्पनांवर ओपन फोरममध्ये चर्चा होईल, असे देशपांडे यांनी सांगितले.

डीडी नॅशनलवर दर शनिवारी सकाळी दहा वाजता माहितीपट दाखवण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. तसेच माहितीपटांच्या चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी आयडीपीए मार्फत मुंबई आणि इतर ठिकाणी माहितीपट प्रदर्शनाला वाव दिला जातो, अशी माहिती संस्कार देसाई यांनी दिली. माहितीपटांसाठी एक स्वतंत्र दूरचित्रवाणी वाहिनी असावी, असा आयडीपीएचा प्रस्ताव असून, त्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत, असे देसाई यावेळी म्हणाले.