गोवा खबर:भारतातील कोविड-१९ ची परिस्थिती, लस पुरविणे, त्याचे वितरण व प्रशासन इ. गोष्टींचा आढावा घेण्यासाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयातर्फे सर्व मुख्यमंत्र्यांची व इतर संबंधित अधिकार्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली.
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते, तर गृहमंत्री श्री. अमित शहा या बैठकीचे समन्वयक होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सचिवालयातून या बैठकीला उपस्थिती लावली.
Attended the VC meeting chaired by Hon’ble PM Shri @narendramodi ji with Chief Ministers of states. Discussions were held on various measures adopted to control #COVID19. pic.twitter.com/5Of2Rq7Gjb
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) November 24, 2020
या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा जीव वाचविण्यासाठी हे सरकार अग्रक्रमाने प्राधान्य देते, असे पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितले. कोविड महामारीमुळे उत्पन्न झालेल्या बिकट परिस्थितीतून आपण जात आहोत. ही परिश्थिती हाताळण्यासाठी सरकारने सुरूवातीपासूनच विविध उपाययोजना केल्या आहेत आणि नागरिकांचे प्राण वाचविण्यावर विशेष भर दिला आहे, असे ते म्हणाले.
देशातील कोविड इस्पितळांना व्हेंटिलेटर पुरविण्यासाठी आपण पंतप्रधान निधीचा वापर केला असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. देशातील कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी विविध प्रतिपंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सर्व राज्यांचा सहभाग आवश्यक आहे आणि त्यासाठी सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. कृतीचे नियोजन करण्यासाठी आवश्यक त्या सूचना व माहिती देणे गरजेचे आहे. चाचण्या गतीमान करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. आरोग्य कर्मचार्यांनी कोरोना रूग्णांची तपासणी योग्य पद्धतीने करावी, जेणेकरून मृत्यूदर शून्यावर येईल, असे आवाहन त्यांनी केले. ही महामारी अधिक काही काळ राहणार असून, त्यासाठी आपण पद्धतशीरपणे काम करणे आवश्यक आहे, कारण नागरिकांचे प्राण वाचविणे हेच आपले सर्वोच्च ध्येय आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
या बैठकीला सर्व राज्यशासित प्रदेशांचे राज्यपाल, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्य सचिव उपस्थित होते. आरोग्य सचिवांनी आपल्या संबंधित राज्यांचे कोविड महामारीवरील अहवाल सादर केले.
मुख्य सचिव श्री. परिमल राय, आयएएस, पोलीस महासंचालक श्री. मुकेश कुमार मीना, आयपीएस, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जोझ डि सुझा, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी श्री. अजित रॉय, आयएएस, गृहसचिव श्री. तारिक थॉमस, आयएएस, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्री. जे. अशोक कुमार, आयएएस, वित्त सचिव श्री. पियुष गोयल, आयएएस, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य सचिव अमित सतीजा, आयएएस हे या बैठकील उपस्थित होते.