प्राणवायु, कोविड औषधे व लसींच्या उपलब्धतेचा अहवाल दररोज जाहिर करा व दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकला : दिगंबर कामत 

0
126
गोवा खबर : गोव्यात कोविडचा संसर्ग फैलावत असुन, सरकारने वाढत्या रुग्णांच्या उपचारांसबंधी आखलेल्या उपाययोजनांची माहिती लोकांसमोर मांडणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात उपलब्ध प्राणवायु, रेमेडेसिवीर सारखी  कोविड औषधे तसेच कोविड लसींच्या उपलब्धतेचा अहवाल दररोज जाहिर करावा जेणे करुन लोकांच्या मनातील भय व चिंता कमी होईल अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे. सरकारने विद्यार्थ्यांची मागणी ऐकुन दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
आज गोव्यात प्राणवायु तसेच कोविड रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांचा  तुडवडा असल्याची माहिती काही सुत्रांकडून मला मिळाली आहे. राज्यात प्राणवायु, औषधे तसेच लसींचा आवश्यक साठा उपलब्ध करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने कोविडची सद्य परिस्थीती हाताळण्यासाठीचा कृती  आराखडा पारदर्शकपणे लोकांसमोर ठेवावा.
सरकारने सर्व आमदार तसेच इतर लोकप्रतिनीधीना विश्वासात घेवुनच राज्यात लसीकरण मोहिम राबवावी. लसीकरणात राजकीय हस्तक्षेप होता कामा नये असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
सरकारने राज्यात फैलावत असलेल्या कोविड संसर्गाला आळा घालण्यासाठी जलद कृती आराखडा तयार करणे गरजेचे आहे. राज्यात येणाऱ्या लोकांवरही निर्बंध घालणे गरजेचे आहे. सरकारने आपले “व्हेल्थ इज हेल्थ” धोरण  बाजुला सारुन “हेल्थ इज व्हेल्थ” हेच धोरण राबवावे असे दिगंबर कामत म्हणाले.
गेल्या वर्षभरात शैक्षणिक वर्षाच्या व्यवस्थापनाबद्दल  कोणतेच धोरण तयार न करता सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षांबद्दल गोंधळाचे वातावरण तयार केले आहे.
राज्यात उपलब्ध इंट्रानेट ऑप्टीक फायबर केबलच्या आधारे दूरस्थ शिक्षण प्रणाली राबविण्याची सुचना मी सातत्याने वर्षभर करीत होतो. दुर्देवाने सरकारने या सुचनेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच आता विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालुन त्यांना परीक्षा देण्यासाठी आज केंद्रांवर बोलविण्याचा खटाटोप सरकार करीत आहे असे दिगंबर कामत म्हणाले.