प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्याकर्ते यांच्यावर घातलेली गोवा प्रवेशबंदी हटवा

0
959

राज्यातील विविध संघटनांची उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

गोवाखबर:श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांच्यावर घालण्यात आलेली गोवा प्रवेशबंदी त्वरित हटवावी, अशी मागणी राज्यातील विविध संघटनांनी १५ मार्च या दिवशी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांच्या अनुपस्थितीत अतिरीक्त जिल्हाधिकारी विकास गावणेकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची एक प्रत मुख्यमंत्री कार्यालय, शासनाची मंत्रीमंडळ सल्लागार समिती आणि दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आली आहे.
शिष्टमंडळामध्ये हिंदु एकता संघाचे हरिचंद्र शर्मा, म्हापसा येथील गणेश मंडळाचे  एकनाथ म्हापसेकर, शिवसेनेचे माजी गोवा राज्यप्रमुख  रमेश नाईक, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे  सुरेश वेर्लेकर, चिंबल येथील शिवप्रेमी  त्रिवेंद्र नाईक, सनातन संस्थेचे गोपाल बंदीवाड आणि हिंदु जनजागृती समितीचे  जयेश थळी यांची उपस्थिती होती.
शिष्टमंडळाने  मुतालिक आणि श्रीराम सेनेवरील कार्यकर्ते यांच्यावरील बंदी दर सहा महिन्यांनी वाढवली जात आहे. या बंदीमध्ये अजून वाढ करण्यात येणार आहे का? राज्यात आतंकवाद्यांशी संबंध असलेल्या रोहिंग्याच्या समर्थनार्थ फेरी काढण्यास अनुमती दिली जाते, वादग्रस्त ‘पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया’ला परिषद भरवण्यास अनुमती दिली जाते; मात्र संस्कृतीरक्षक, समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य करणारे आणि समाज व्यसनमुक्त व्हावा यासाठी कार्य करणार्‍या जेष्ठ व्यक्तीला गोवा प्रवेशबंदी का?  मुतालिक यांना गोव्यात देवदर्शनासाठी अनुमती का नाकारली जाते? असे विविध प्रश्‍न शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना केले. शिष्टमंडळाला जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार  मुतालिक आणि श्रीरामसेनेचे कार्यकर्ते यांच्या गोवा प्रवेशबंदीत वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे तूर्तास नसल्याचे समजले. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,  मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांच्यावर वर्ष २०१४ पासून गोव्यात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. प्रारंभी ६ मासांसाठी असलेला हा बंदीकाळ आता प्रत्येक ६ मासांनी अमर्यादपणे वाढवला जात आहे. वास्तविक गोव्यात  मुतालिक किंवा श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांनी राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवल्याचा किंवा कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याची एकही घटना घडलेली नाही. मंगळुरू येथे पबमध्ये झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणी न्यायालयाने  मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांची निर्दोष सुटका केली आहे. न्यायालयाच्या निवाड्यावरून स्पष्ट होत आहे की, मुतालिक यांना या प्रकरणात कोणतेही कारण नसतांना गोवण्यात आले होते आणि राजकीय सूडापोटी त्यांचा छळ करण्यात आला. गोवा शासनाने न्यायालयाच्या निर्णयाची दखल घेऊन मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांच्यावर घातलेली अन्यायकारक गोवा प्रवेशबंदी तत्परतेने हटवून त्यांना देशात कुठेही फिरण्याचा संविधानिक अधिकार मिळवून द्यावा.
गोवा सरकारने मुतालिक यांच्यावर आकसापोटी लादलेली अनधिकृत प्रवेशबंदी रहित करावी ! – रमेश शिंदे, 
 प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना मिळालेल्या न्यासासंदर्भात बोलतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे म्हणाले,‘‘सदर निर्णयाच्या माध्यमातून मुतालिक यांना राजकीय षड्यंत्रात गोवून त्यांचा छळ केला गेला, हे आता उघड झाले आहे. मी त्यांचे अभिनंदन करता, तसेच न्यायालयाचेही आभार व्यक्त करतो. सर्व प्रसारमाध्यमांनी ‘मीडिया ट्रायल’च्या माध्यमातून  मुतालिक यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना प्रत्येक ठिकाणी ‘पबवरील आक्रमणाचे दोषी’ म्हणून हिणवले गेले. एखाद्या हिंदुत्वनिष्ठ नेत्याला अपकिर्त करण्याचे हे एक षड्यंत्र होते. आज गौरी लंकेश प्रकरणातही हेच चालू आहे. गोवा सरकारने  प्रमोद मुतालिक यांच्यावर लादलेली गोव्यातील अनधिकृत प्रवेशबंदी रहित करावी, अशी आमची मागणी आहे.’’