प्रभात फेरीद्वारे आयुषमान भारत-पोषण अभियान जनजागृती

0
1020

 गोवा खबर:माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या रिजनल आऊटरीच ब्युरो, पुणे यांच्यातर्फे आज गोव्यामध्ये प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. आयुषमान भारत योजना तसेच पौष्टिक आहाराचे महत्व सांगणारे पोषण अभियान यांच्या जनजागृतीसाठी या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते झेंडा दाखवून या प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली. तसेच पोषण अभियान गीताचे लोकार्पण देखील यावेळी राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. वरूण साहनी, रजिस्ट्रार वाय. व्ही. रेड्डी, राज्यपालांचे सचिव रुपेश ठाकूर, पत्र सूचना कार्यालय, पश्चिम विभाग प्रमुख महासंचालक आर. एन. मिश्रा तसेच पत्र सूचना कार्यालय, पणजी प्रमुख अपर महासंचालक अर्मेलिंदा डायस आदि मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी उपस्थितांना पोषण आहार जनजागृतीची शपथ दिली.

राज्यातील काही शाळा, महाविद्यालय तसेच विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, पत्र सूचना कार्यालय, पणजी तसेच रिजनल आऊटरीच ब्युरो, पुणेचे अधिकारी व कर्मचारी या प्रभात फेरीसाठी उपस्थित होते. गोवा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीपासून या प्रभात फेरीची सुरुवात झाली; पुढे काकरा, बांबोळी गावातून फिरून सर्वांनी घोषणा फलक व पोषण अभियान गीताच्या माध्यमातून आयुषमान भारत व पोषक आहाराविषयी जागृती केली.

याप्रसंगी महाराष्ट्राच्या सांगली जिल्हयातील शाहीर बजरंग आंबी आणि मंडळी तसेच मेरशी, गोवा येथील कलाकार ग्रुप यांनी लोककलेच्या माध्यमातून आरोग्य जागृती केली.