प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची राज्यात औपचारिक सुरुवात

0
799

गोवा खबर:१५ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरु झालेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे आज राज्यात औपचारिक लोकार्पण करण्यात आले. पणजी येथील सहकार संकुलमधील गोवा राज्य सहकारी बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक तसेच राज्याच्या विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.

राज्याचे क्षेत्रीय अधिकारी व अतिरिक्त केंद्रीय भविष्य निधी आयुक्त नारायण कम्मा यांनी उपस्थितांना या योजनेविषयी माहिती दिली.

या कार्यक्रमात आपले विचार मांडताना नाईक यांनी असंघटीत कामगारांना निवृत्तीवेतन देण्याची योजना आणल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. जो वर्ग निवृत्तीवेतनाचा विचारही करू शकत नव्हता, त्यांना मिळणारा हा लाभ उतारवयात त्यांचे आयुष्य काही प्रमाणात तरी सुखकर करेल; तसेच भविष्यात या मानधनाची रक्कम देखील वाढेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. ज्या गरीबाकडे मुलभूत सुविधा देखील नाहीत, त्यांना वर आणणे, हे सरकारचे काम आहे. त्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे. जन-धन योजनेमध्ये प्रत्येकाचे बचत खाते सुरु करणे म्हणजे योजनांचे लाभ लाभार्थ्याच्याच खात्यात जमा होतील, याचे नियोजन होते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. राज्यातील अधिकारी चांगल्या पद्धतीने ही योजना राबवतील व लाभार्थ्यांना पूर्ण हक्क मिळवून देतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील योजनेचा लाभ सर्व असंघटीत कामगारांनी घ्यावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात २० नागरिकांना या योजनेची ओळखपत्र देण्यात आली.