प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष कुतिन्हो यांच्या विरोधात गुन्हा नोंद

0
1057
 गोवा खबर:सांगे येथील अल्पवयीन पीडित युवतीची ओळख जाहिर केल्याप्रकरणी प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांच्यासह चार जणांविरोधात पणजी येथील महिला पोलिस स्थानकात गुरुवारी एफआयआर नोंदवण्यात आली.दक्षिण गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा तथा विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर, नेत्रावळी पंचायतीचे उपसरपंच अभिजीत देसाई तसेच पंचायत सदस्य विठ्ठल गावकर व  प्रकाश भगत यांचा या एफआयआरमध्ये समावेश करण्यात आला आहे.
पोलिसांनी या सर्व जणांविरोधात   पॉस्को तसेच  जुवेनाईल जस्टीस  कायदा 2012 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.  विनयभंग झालेल्या  अल्पवयीन पीडितेची ओळख जाहीर केल्याप्रकरणी शिवसेना गोवा उपराज्यप्रमुख राखी  प्रभुदेसाई नाईक यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या पार्श्‍वभूमीवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पीडित युवतीचा झारखंड येथील युवकाने विनयभंग केला होता. घटना समजताच  कुतिन्हो तसेच अन्य संशयितांनी सांगे येथील अल्पवयीन पीडितेेच्या घरी जाऊन 8 जुलै रोजी  तिची भेट  घेतली होती. या भेटीनंतर पीडितेच्या नातेवाईकांच्या  फोटो असलेली पोस्ट  सोशल मीडियावर टाकल्या नंतर कुतिन्हो यांच्या विरोधात राजकीय पक्ष आणि महिला संघटनांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.
नेत्रावळी उपसरपंच देसाई यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा नोंद
नेत्रावळी उपसरपंच अभिजीत देसाई यांच्या विरोधात गुन्हा अन्वेषण विभागाने कलम 500,509 खाली गुन्हा नोंदवला आहे.शिवसेना उपराज्यप्रमुख राखी नाईक यांनी यासंदर्भात तक्रार नोंद केली होती.देसाई यांनी आपल्या फेसबुकवर टाकलेल्या पोस्ट मध्ये राखी नाईक आणि त्यांच्या पतीचा उल्लेख बंटी आणि बबली जोडे असा उल्लेख केला होता.पोलिसानी प्राथमिक तपास करून अब्रुनुकसानी आणि विनयभंग केल्याचा ठपका ठेवला आहे.