प्रत्येक ग्रामीण घरांना १०० टक्के नळजोडणी पुरवणारे गोवा देशातील पहिले राज्य ठरल्याची घोषणा म्हणजे भाजपचा जुमला : विजय भिके

0
316
गोवा खबर: गोव्यातील प्रत्येक  ग्रामीण घरांना १०० टक्के नळ जोडणी पुरवणारे गोवा हे “हर घर जल’ योजनेतील पहिले राज्य असल्याचा केंद्रिय जल शक्ती मंत्र्यांचा दावा म्हणजे भाजपचा जुमला असल्याची, टिका उत्तर गोवा जिल्हा काॅंग्रेस अध्यक्ष विजय भिके  यांनी केली आहे. 
आज ही अनेक गावातील  लोक विहीरीवरील वा जवळच्या नदी-ओढ्यातील पाणी वापरत आहेत तर शहरातील लोक कोरड्या नळांमुळे हवालदील झाल्याचा दावा  भिके यांनी केला आहे. म्हापसा शहरात एकतर नळ कोरडे असतात वा गढुळ पाण्याची समस्या लोकांना भेडसावते. पणजी, मडगाव, वास्को व इतर ठिकाणी लोकांना आज पाण्याची समस्या ग्रासत आहे,याकडे भीके यांनी लक्ष वेधले आहे.
केंद्रिय जलशक्ती मंत्र्यानी हिम्मत असेल तर गोव्याला भेट द्यावी. आम्ही त्यांना प्रत्येक खेड्यातील व शहरातील नळाच्या पाण्याची समस्या दाखवुन देण्याचे व त्यांचा दावा खोटा ठरविण्याचे आव्हान स्विकारतो. केंद्रिय मंत्र्यांची घोषणा म्हणजे विहीरीचे पाणी वा जवळच्या नदी- ओहोळातील पाणी आणुन आपली गरज भागवणाऱ्या गोमंतकीयांच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखे आहे अशी टिका  भिके यांनी केली आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सन २०१४ मध्ये जुमला राजकारण करुन सत्तेवर आले व आज पर्यंत फेकूबाजी करुन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे. आज देशा समोरील आव्हाने व लोकांच्या समस्या सोडवु न शकलेले भाजप सरकार पोकळ घोषणा करुन  अच्छे दिनाचे कृत्रीम वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे अशी टिका  भिके यांनी केली.
गोवा राज्य हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा सरकारने केली होती. परंतु आजही अनेक ठिकाणी शौचालये उपलब्ध नसल्याने लोक उघड्यावर शौचास जात आहेत. गोवा शंभर टक्के हागणदारी मुक्त झाला असल्यास सरकार अजुनही नवीन शौचालयांची का खरेदी करत आहे असा सवाल मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांना काॅंग्रेसने केला आहे.
आज गोमंतकीय जनता भाजप सरकारच्या जुमलेबाजीला कंटाळली असुन, सन २०२२ च्या निवडणुकीत लोक भाजपला योग्य धडा शिकवतील,असा इशारा देखील भीके यांनी दिला आहे.