
गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत ‘रिपब्लिक टीव्ही’ या खासगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या चर्चासत्रात भाषण केले. मुंबईत काल लागलेल्या आगीत बळी गेलेल्यांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली.
समृद्ध आणि प्रगतीशील देशाच्या उभारणीसाठी सकारात्मक बातम्यांचे विशेष महत्व असते असे पंतप्रधान म्हणाले. विज्ञान, संशोधन आणि क्रीडा यासारख्या अनेक क्षेत्रात भारताला अद्याप मोठी उंची गाठायची आहे. यात प्रसारमाध्यमांचाही समावेश आहे असे पंतप्रधान म्हणाले. या परिषदेची संकल्पना ‘सर्जिंग इंडिया’ म्हणजेच वाढत असलेला भारत देशातल्या 130 कोटी भारतीयांच्या आकांक्षेचे वर्णन करणारी आहे असे पंतप्रधान म्हणाले.
भारत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने प्रवास करेल, उद्योगस्नेही वातावरणाच्या क्रमवारीत मोठी झेप घेईल अशा गोष्टींची काही वर्षांपूर्वी कोणी कल्पनाही केली नसेल मात्र आज ते प्रत्यक्षात घडते आहे असे त्यांनी सांगितले. गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या लोकांना आज शिक्षा होत असल्याची उदाहरणं त्यांनी आपल्या भाषणातून दिली. स्वच्छतेपासून तर करव्याप्ती वाढेपर्यंतची सर्व उदाहरणे देत गेल्या चार वर्षात देशात आलेल्या परिवर्तनाचे सखोल विश्लेषण पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केले. धोरण प्रवण प्रशासन आणि सुनिश्चित, पारदर्शक धोरणांमुळे देशातल्या प्रत्येक क्षेत्रात बदल होत आहे असे त्यांनी सांगितले. ‘प्रगती’च्या बैठकींमध्ये वर्षांनुवर्षे रखडलेल्या प्रकल्पांना मार्गी लावले गेल्याची उदाहरणे त्यांनी भाषणामधून दिली. आत्तापर्यंत 12 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे प्रकल्प मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्या सरकारने गोष्टी केवळ नियम कायद्यांमध्ये अडकवून न ठेवता कृती करण्याचे धोरण आखले आहे. प्रत्येक प्रश्नाला कायमस्वरुपी उत्तर शोधून शाश्वत विकासाच्या दिशेने देशाची प्रगती करणे ही आमच्या सरकारची कार्यसंस्कृती आहे असे मोदी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नादारी आणि दिवाळखोरी संहितेचा उल्लेख केला.
सरकारचे परराष्ट्र धोरण देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत राबवले जात आहे तसेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताच्या मताला महत्व मिळाले आहे असे पंतप्रधान म्हणाले.
वस्तू आणि सेवा करामध्ये असलेल्या शेवटच्या 28 टक्के श्रेणीत केवळ काही चैनींच्या वस्तूंचा समावेश असेल. इतर सर्व कामाच्या वस्तू सर्वसामान्यांना परवडाव्यात यासाठी 99 टक्के वस्तूंवर केवळ 18 टक्के जीएसटी लावला जातो असे पंतप्रधानांनी सांगितले.