गोवा:तब्बल 1208 पुस्तके लिहून मराठी साहित्य विश्वात अब्जावधीचे साहित्यिक मूल्य असलेले साहित्य निर्मिती करणारा लेखक आयुष्याच्या एका वळणावर आजरपण आणि आर्थिक चणचण यातून मार्ग काढत आपल्या आयुष्याचे रहस्य उलगडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.काल पुन्हा एकदा त्यांना उपचारासाठी मणीपाल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून हा खर्च भागवणे त्यांच्या कुटुंबियांच्या आवाक्या बाहेर जात आहे.गोव्याचे कला आणि सांकृतिक मंत्री गोविंद गावडे यांना नाईक यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच त्यांनी मणीपाल हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची विचारपूस केली आणि आपल्या खात्यातर्फे कलाकार कृतज्ञता निधी मधून त्वरित मदत देणार असल्याचे स्पष्ट केले.

कॅप्टन दीप, गोलंदाज, धुरंधर, शिलेदार, गरूड, शब्दवेधी, रातराणी ही व्यक्तिरेखांची नावं उच्चारताच ज्यांची आठवण होते आणि ज्यानी तब्बल 1208 रहस्यमय कादंबऱ्या
लिहिल्या आहेत असे विक्रमवीर लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ नाईक
सध्या गोव्यात विपन्नावस्थेशी आणि आजारांशी झुंज देत आहेत. ७९ वर्षांचे नाईक गेली बारा वर्षं ब्रेन स्ट्रोकच्या आजाराने ग्रस्त आहेत. आता त्यांच्या छातीत इन्फेक्शन झाल्याने त्यांच्यावर गोव्यातील मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मूळ डिचोली तालुक्यातील साखळी येथील असलेल्या नाईक यांना काही पत्रकारांच्या पुढाकाराने गोवा सरकारकडून निवासासाठी भाड्याने सरकारी फ्लॅट मिळाला आहे आणि
गोवा सरकारची दरमहा तीन हजार 200 रुपयांची पेन्शनही त्यांना मिळते.जेमतेम 3200 रूपयात गुरुनाथ नाईक यांना आजरपण आणि घरख़र्च यांची सांगड घालावी लागत आहे.

त्यांच्या आणि पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी आणि
औषधोपचारांसाठी अन्य कोणतंही उत्पन्नाचं साधन त्यांच्याकडे
नाही. त्यांच्या निवडक पुस्तकांचे नव्याने संच काढून त्यातून त्यांना
काही घसघशीत आर्थिक तरतूद करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न
सुरू आहेत. मात्र, हा प्रकल्प वास्तवात यायला काही काळ जाईल.

त्यांचा मुलगा लातूरमध्ये
एमएस्सीचं शिक्षण घेत आहे आणि तो कॉलेजखर्चही अर्धवेळ नोकरी
करून भागवतो. नाईक यांना आर्थिक मदतीची गरज आहे.

इच्छा असलेल्यांनी कृपया पुढील बँक खात्यात रक्कम जमा करावी, अस आवाहन त्यांची पत्नी गीता नाईक यांनी केले आहे.गीता नाईक यांनी केलेल्या आवाहना नंतर जवळपास 80 हजार रूपयांची मदत त्यांच्या खात्यात जमा झाली आहे.दात्यांकडून मिळणारे पैसे गुरुनाथ नाईक यांच्या उपचारावरच खर्च केले जात आहेत.4 वर्षापूर्वी देखील त्यांच्या पत्नीने आवाहन केल्या नंतर 80 हजार रूपयांची मदत जमली होती त्यातून त्यांच्या आजरपणावर खर्च करण्यात आला असल्याची माहिती नाईक यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

मदतीसाठी बँक अकाउंट नंबर

स्टेट बँक ऑफ इंडिया
खाते क्र. : 31180667793
आयएफएससी : SBIN0005554