पोलिस निरीक्षक जिवबा दळवी पोलिस समाजमित्र पुरस्काराचे मानकरी

0
767

गोवा खबर:गोवा पोलिसाच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन २१ पोलिस अधिकाऱ्यांना ‘स्वाभिमान’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. भारतीय रेड क्राॅस सोसायटी गोवा, राजेश्री क्रिएशन गोवा आणि राज हाऊसिंग यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच हा सोहळा आयोजित केला होता. ‘स्वाभिमान २०१९ पोलिस समाजमित्र’ पुरस्कार पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांना प्राप्त झाला आहे. राज्यपाल डाॅ. मृदुला सिन्हा यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

हा पुरस्कार सोहळा  कला अकादमीच्या दर्यासंगमावर संपन्न झाला. यावेळी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, पोलिस महासंचालक डाॅ. मुक्तेश चंदर, पोलिस महानिरीक्षक जसपाल सिंग, भारतीय रेड क्राॅस सोसायटीचे गोवा विभागाचे अध्यक्ष गौरीश धोंड, उपाध्यक्ष मांगिरीष रायतूरकर, राजेश्री क्रिएशनचे संचालक परेश नाईक आणि राज हाऊसिंगचे अध्यक्ष संदीप निगळ्ये व इतर मान्यवर उपस्थित होते.


यावेळी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केलेल्या पोलिसांमध्ये दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस, उत्तर गोवा वाहतूक पोलिस उपअधीक्षक धर्मेश आंगले, वास्को विभागीय पोलिस अधिकारी सुनिता सावंत, गुन्हा शाखेचे पोलिस उपअधीक्षक सॅमी तावारिस, पणजी पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर, गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजन निगळे, फोंडा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक हरिश्चंद्र मडकईकर, वेर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक निनाद देऊलकर, पोलिस उपनिरीक्षक दत्ताराम राऊत, काणकोण वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक गौतम साळुंखे, केपे वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक सुरज सामत, पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक अनिता गिरप, हेमा भिसे, राॅक इस्तेबियेरो, पोलिस हवालदार दिशा मापारी, सय्यद सुलेमान, शामिर नागनुरी, महिला पोलिस काॅन्स्टेबल अनिता पावसकर, पोलिस काॅन्स्टेबल केशव नाईक आणि गौरखनाथ गावस यांना ‘स्वाभिमान २०१९’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

या पुरस्कार समारंभवेळी पोलिस महासंचालक डाॅ. मुक्तेश चंदर यांचे मुरली वादन, ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकार भारत गणेशपुरे व भाऊ कदम आणि सहकाऱ्यांचा कार्यक्रम चांगलाच रंगला. तसेच बाॅलिवूड गायक राहुल सक्सेना यांनी सादर केलेल्या गीतांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.