‘पोकर स्पोर्टस लीग’च्या दुसऱ्या हंगामाचे विजेते ‘गोअन नटस’

0
2885
  •                                     गोव्याचा संघ २ कोटी रुपयांचा मानकरी     

गोवा खबर: संघ या कल्पनेवरच आधारित असलेल्या जगातील सर्वात मोठया ‘पोकर स्पोर्टस लीग’च्या दुसऱ्या हंगामाची रविवारी (१३ मे) चमकदार सांगता झाली. यात ११ संघ ४ कोटी ५० लाख रुपये रकमेच्या पारितोषिकांसाठी झुंजले. या लीगसाठी संघबांधणी व निवडीचे काम ६ महिने अविश्रांत चालू होते. अखेर विजेत्या संघाचा मुकुट आणि २ कोटी रुपयांचे पारितोषिक ‘गोअन नटस’ने पटकाविले.

यंदा पारितोषिकांची रक्कम ४ कोटी ५० लाख रुपये होती; त्यापैकी २ कोटी रुपये विजयी संघाने जिंकले. दुसऱ्या क्रमांकाला १ कोटी २० लाख रुपये तर तिसऱ्या क्रमांकाला ९० लाख रुपये मिळाले. या व्यतिरिक्त दर दिवशीच्या विजेत्या संघाला प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात आले.

‘गोअन नटस’ने अंतिम स्पर्धेत सातत्य दाखवून अन्य कोणत्याही संघाला जराही संधी न देता अफलातून खेळ केला आणि चषक जिंकण्याकडे कूच केले.

‘पीएसएल’चे सहसंस्थापक श्री. अमित बर्मन दुसऱ्या हंगामाच्या सांगतेवर बोलताना म्हणाले, की या हंगामाने मर्यादा बरीच वर नेली असून आजच्या खेळामुळे पोकर गोव्यात रुजेल, हे सिद्ध केले आहे. जगभरातील पोकर खेळाडूंना हे व्यासपीठ उपलब्ध करून देऊन या खेळाला द्यायला हवा तो दर्जा मिळण्यासाठी व हा एक कसबी खेळ होण्यासाठी सोई पुरविण्याची भूमिका आम्ही बजावत आहोत. विजेतेपद मिळविण्यासाठी झटलेल्या व हा हंगाम कळसाला नेऊन पोहोचविणाऱ्या प्रत्येक संघाचे मी अभिनंदन करतो.

बुद्धिबळातील ग्रॅन्ड मास्टर आणि ‘पीएसएल’चे ब्रॅन्ड ऍम्बेसेडर  विश्वनाथन आनंद अंतिम सामन्यानंतर बोलताना म्हणाले, की विजेता संघ व या खेळात सहभागी झालेल्या सगळयाच संघांचे मी अभिनंदन करतो. आज आपण काही विस्मयकारक सामने पाहिले. त्यात इतर संघांना ‘गोअन नटस’ने अखेरच्या क्षणी पराभूत करून पारडे स्वत:कडे फिरविले.

पाचव्या दिवशी विजेतेपदासाठी बौद्धिक चमक पाहावयास मिळाली. ‘राजस्थान टिल्टर्स’ संघ दुसरा तर ‘गुजरात फाल्कन्स’ तिसरा आला.

‘पीएसएल’ अंतिम स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ‘आंध्र बुलेटस’ने सर्वाधिक २३९,००० पीएसएल’ गुण जिंकून १० लाख रुपये पटकावले. परंतु दुसऱ्या दिवशी दुर्दैवाने ते हे सातत्य राखू शकले नाहीत आणि स्थानिक ‘गोअन नटस’ ४०१,००० गुण करून पहिला आला. हा संघ ‘दिवसाचा मानकरी’ही ठरला. तिसऱ्या दिवशी गतविजेते ‘दिल्ली पॅन्थर्स’ने ४८३००० गुण केले तर चवथ्या दिवशी ‘चेन्नई थलाइवस’ने ५३९५०० गुण केले.

विजयश्रीमुळे हर्षभरित झालेले ‘गोअन नटस’चे मालक म्हणाले, चषक आणि पारितोषिकाची रक्कम जिंकल्याचा आम्हाला अतीव आनंद होत आहे. हे विजेतेपद मिळविण्यासाठी आमच्या संघाने अपार कष्ट केले आहेत. यापुढे दरवर्षी ते जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करू. हे प्रत्यक्षात आणणारा आमच्या संघाचा कर्णधार धवल मुदगलबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.

भारतीय पोकर खेळाडूंसाठी ‘पीएसएल’ने दारे उघडली आहेत. या हंगामात ११ संघांना संधी देण्यात आली. त्यात प्रत्येकी १० खेळाडू, सल्लागार-कर्णधार, दोन सहखेळाडू, दोन मुक्त पात्र खेळाडू, मुक्त ऑनलाइनवरील तिघे व  वाइल्ड कार्डद्वारे सहभागी होणारे दोघे यांचा समावेश होता.

यंदा अभिषेक गोइंदी (पंजाब ब्लफर्स), श्रवण छाबरिया (राजस्थान टिल्टर्स), सुमित असराणी (कोलकता किंग्ज), कुणाल पटणी (आंध्र बुलेटस), राघव बन्सल (पुणे शार्क्स), आदित्य सुशांत (बंगळुरु वॉरियर्स), कनिष्क सामंत (चेन्नई थलाइवस), आकाश मलिक (दिल्ली पॅन्थर्स), धवल मुदगल (गोअन नटस), रोमित अडवाणी (गुजरात फल्कन्स) आणि अमित जैन (मुंबई ऍन्कर्स) यांनी संघांचे नेतृत्व केले.

‘पोकर स्पोर्टस लीग’बद्दल : भारतात ‘पोकर’ हा क्रीडाप्रकार म्हणून रुजविण्यासाठी ‘पोकर स्पोर्टस लीग’ ही कल्पना सर्वश्री. अमित बर्मन, अनुज गुप्ता आणि प्रणव बागई यांच्या मनात साकारली. ती भारताची पहिलीच व्यावसायिक लीग असून ती राज्य पातळीवरील संघ तसेच पोकरप्रेमींना लीगमधे सहभागी होण्याची व देशातील सर्वोत्कृष्ट पोकर खेळाडूंकडून शिकण्याची संधी देते. ११ संघ व भारतभरातील २० हजार पोकर खेळाडूंच्या येत्या ८ वर्षांच्या सहभागासाठी लीग वचनबद्ध आहे. या हंगामातील वाइल्ड कार्डमधे ११ देश सहभागी झाले होते.