पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला कोणताही कार्यक्रम घेण्यास अनुमती देऊ नये आणि संघटनेवर बंदी घालावी !

0
901

राज्यातील राष्ट्रप्रेमी संघटनांची गोव्याच्या पोलीस महासंचालकांकडे मागणी

पणजी :मूलतत्त्ववादी आणि आतंकवादाशी संबंध असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेला गोव्यात कोणताही कार्यक्रम घेण्यास अनुमती देऊ नये. संघटनेवर गोव्यात बंदी घालावी. संघटनेने शासनाच्या अनुमतीशिवाय मडगाव येथे ३० ऑक्टोबर या दिवशी निदर्शने केल्याच्या प्रकरणी संघटनेवर कारवाई करावी. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी गोव्यातील अन्य कोणत्या संघटना आणि व्यक्ती निगडीत आहेत आणि त्यांचा आतंकवादी आणि राष्ट्रविघातक कृत्ये यांच्याशी काय संबंध आहे ? याची चौकशी करावी. राष्ट्रप्रेमी नागरिकांनी गोव्याचे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांची १ नोव्हेंबर या दिवशी भेट घेऊन त्यांच्याकडे या मागण्या एका निवेदनाद्वारे केल्या.
पोलीस महासंचालक चंदर या वेळी म्हणाले, ‘‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा गोव्याशी काय संबंध आहे ? याचे पोलीस अन्वेषण करत आहेत.’’ राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या शिष्टमंडळामध्ये या वेळी  रमेश नाईक, रामा गावकर, सुरेश वेर्लेकर, मनोज वाळके, चंद्रकांत (भाई) पंडित, अभय सामंत, जयेश थळी आणि राज बोरकर यांचा सहभाग होता. राष्ट्रप्रेमी नागरिकांनी पोलीस महासंचालकांकडे केलेल्या मागणीला शिवसेना, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ, स्वराज्य गोमंतक, शिव साम्राज्य (मडगाव), शिवप्रेमी (वाळपई), ‘भारत माता की जय’, ग्रामरक्षक दल, हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा आणि छत्रपती शिवाजी महाराज संघटना (वास्को) या राष्ट्रप्रेमी संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.
राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या निवेदनात म्हटले आहे की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेला मडगाव येथे २९ ऑक्टोबर या दिवशी महामेळावा घेण्यास शासनाने अनुमती नाकारली होती. यानंतर ही संघटना पुन्हा एका मोठा मेळाव्याचे आयोजन करण्याच्या सिद्धतेत आहे. मेळाव्याला शासनाने अनुमती द्यावी यासाठी निदर्शने करणे, पत्रकार परिषदा घेणे आदी माध्यमातून ही संघटना शासन आणि पोलीस यंत्रणा यांवर दबाव आणत आहे. राज्यातील काही संघटनाही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला गोव्यात मेळावा घेण्यास पाठिंबा दर्शवत आहेत. विशेष म्हणजे या संघटनेने ३० ऑक्टोबर या दिवशी मडगाव येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाची अनुमती न घेताच निदर्शने केली, तरीही या संघटनेवर कारवाई का झालेली नाही ? ३१ ऑक्टोबर या दिवशी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने एक शोधमोहीम हाती घेऊन पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया केरळ राज्यात हिंदु मुलींचा बुद्धीभेद करून त्यांचा मुसलमान युवकांशी विवाह लावत असल्याचे उघड केले आहे. ‘ऑपरेशन कन्वर्जन फॅक्टरी’ या नावाने ही शोधमोहीम राबवण्यात आली होती. या अनुषंगाने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे अन्वेषण करत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ६ डिसेंबरच्या अनुषंगाने बाबरी मशिदीच्या अनुषंगाने चिथावणीखोर पत्रके राज्यात ठिकठिकाणी प्रत्येक वर्षी लावत असते. यंदाही असा प्रयत्न केला जाण्याची शक्यता असून यामुळे राज्यात धार्मिक कलह निर्माण होऊन येथील शांतता बिघडण्याची शक्यता आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री आणि गृह खाते यांना देण्यात आली आहे.