गोवा खबर:आमेरे-पेडणे येथे कोसळलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेचे कारण शोधण्यासाठी सरकारने उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांच्या सुपुत्राच्या ॲाडी गाडीच्या कनेक्शनचा तपास करणे गरजेचे आहे, अशी मागणी गोवा प्रदेश काॅंग्रेस समितीचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

भाजपच्या भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. मिशन ३० टक्के कमिशनचे धोरण राबवणारे पेडणेचे आमदार  तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यामुळेच आज विवीध कामांचा दर्जा घसरत चालला आहे. त्यात मुख्यमंत्री, बांधकाम मंत्री तसेच भाजपला हप्ते देऊन कंत्राटदार कामांचा दर्जा न राखताच सरकारी तिजोरीची लूट करतात असा आरोप  पणजीकर यांनी केला आहे.
भ्रष्टाचाराने माखलेल्या भाजप सरकारची लक्तरे आता निसर्गच उघड्यावर आणत आहे. याच कंत्राटदाराच्या खालच्या दर्जाच्या कामाचे उदाहरण फातोर्डा स्टेडियमचे ३०० पत्रे उडून गेल्यानंतर समोर आले होते. याच एमव्हिआर कंत्राटदारामुळे खांडेपार येथिल जलवाहिनी फुटून पणजीकराना जवळ जवळ एक आठवडा पाण्याविना दिवस काढावे लागले होते याची आठवण  पणजीकर यांनी करुन दिली.
भाजपच्या उच्च पदस्थांचा वरदहस्त लाभलेल्या मेसर्स एम. वेंकट राव ह्या मुजोर कंत्राटदाराच्या बेपर्वाईच्या कामांमूळे गोव्यात अनेकांचे बळी गेले तरी सरकार जागे होत नव्हते. आज निसर्गानेच या कंत्राटदारावर सूड उगवला असा टोला पणजीकर यांनी लगावला.
बाबू आजगावकरांच्या सुपुत्राने याच कंत्राटदाराकडुन ॲाडी गाडी घेतली होती. त्या गाडीच्या व्यवहाराची चौकशी करणे गरजेचे आहे. त्यातुनच या रस्त्याच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उजेडात येतील,अशी मागणी पणजीकर यांनी केली आहे.