पेट्रोल पंपावर नागरिकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी गोव्यात ५२ पेट्रोल पंपांवर राबवले ‘सुराज्य अभियान’ !

0
1011

नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाला निवेदन सादर, पेट्रोल पंप निरीक्षण अहवाल पेट्रोल पंप कंपनीला त्वरित पाठवण्याचे संचालकांचे आश्‍वासन

पणजी: देशभरात राबवण्यात आलेल्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत गोव्यातील ५२ पेट्रोल पंपांना भेट देऊन ग्राहकांचे अधिकार, तसेच पेट्रोलियम आस्थापनांनी घातलेली नियमावली यांचे पालन होते आहे कि नाही, याची पाहणी करण्यात आली. यासंबंधी पेट्रोल पंप निरीक्षण अहवाल १४ डिसेंबर या दिवशी नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाचे संचालक  महेश खोर्जुवेकर यांना देण्यात आले. या अभियानाअंतर्गत गोवा वैध मापन अधिकारी  कोसंबी यांचीही नुकतीच भेट घेऊन त्यांना यामध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करण्याची विनंतीही करण्यात आली. या अभियानाअंतर्गत गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, देहली, उत्तरप्रदेश, बिहार आणि हरियाणा या एकूण ८ राज्यांतील ३५ जिल्ह्यांतील एकूण ४८४ पेट्रोल पंपांना भेटी देण्यात आल्या.
दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच ‘पेट्रोल’ हे सुद्धा मानवी जीवनासाठीचा आवश्यक घटक बनला आहे. पेट्रोल भरण्यासाठी आपण पेट्रोल पंपावर जातो; मात्र बहुतांश ठिकाणी पेट्रोल कमी देणे, तर भेसळयुक्त पेट्रोल देणे आदी माध्यमांतून नागरिकांची नित्य फसवणूक होत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. ही फसवणूक रोखण्यासाठी ‘सुराज्य अभियाना’च्या माध्यमातून राष्ट्रप्रेमी नागरिकांनी आता कंबर कसली आहे, अशी माहिती ‘सुराज्य अभियाना’चे संयोजक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी दिली. पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या वाहनांमध्ये विनामूल्य हवा भरून देणे, त्यांच्यासाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था असणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे अशा विविध सोयी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. तरी अनेक ठिकाणी स्वच्छतागृहे नाहीत, पाण्याची व्यवस्था नाही आदी सुविधांचा अभाव असल्याचे या पाहणीत दिसून आले. त्यामुळे याविषयी त्वरित कृती करून दोषींवर कडक कारवाई करावी आणि जनतेची लुबाडणूक थांबवावी, अशी मागणी ‘सुराज्य अभियाना’चे संयोजक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी गोव्यातील संबंधित अधिकार्‍यांसह ‘भारत पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस मंत्रालय’ आणि ‘ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा ग्राहक मंत्रालय’ यांच्याकडे केली आहे. या जनहितार्थ अभियानात नागरिकांनीही यशाशक्ती सहभाग घ्यावा, अभियानात सहभागी होऊ इच्छिणार्‍या नागरिकांनी ९५९५९८४८४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही अधिवक्ता सांगोलकर यांनी केले.