पुरग्रस्तांसाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची खासदार निधीतून 50 लाखांची मदत

0
801
गोवा खबर:पावसामुळे आलेल्या पुरात उत्तर गोव्यात किमान 10 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून हे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून पूर्ण मदत मिळवली जाईल. खासदार निधीतून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 50 लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, असे उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी जाहीर केले.
उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जिल्हाधिकारी  आर मेनका, अतिरिक्त जिल्हाधिकारी एस. एन. गावणेकर, गोपाळ पार्सेकर, दशरथ रेडकर, इतर उपजिल्हाधिकारी, पेडणे, बार्देश, डिचोली व तिसवाडी तालुक्याच्या मामलेदारांबरोबर संयुक्त बैठक घेऊन केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी नुकसानीचा आढावा घेतला.
 उत्तर गोवा खासदार या नात्याने नाईक यांनी खासदार निधीतून 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली.
 67 टक्के पाऊस फक्त 7 दिवसात पडला. सर्वांत जास्त शेतीचे नुकसान झाल्याचे नाईक यांनी सांगितले. तिसवाडी तालुक्यात आखाडा, चोडण, करमळी, सांताक्रुझ आणि पणजीतील काम्राभाट, पेडण्यात इब्रामपूर, हळर्ण, तळर्ण, वजरी, सांगववाडा, फकीरपाट, बैलपार, खुटवळ हे भाग बुडाले. सुमारे 300 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 250 लोकांना स्थलांतर करावे लागले. सुमारे 100 घरांचे नुकसान झाले. एकूण 4 घरे कोसळली, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
बार्देश तालुक्यात रेवोडा, कोलवाळ, कामुर्ली, नानोडा, पोंबुर्फा या ठिकाणी पुराचा परिणाम झाला. दोन घरे कामुर्ली व कोलवाळ येथे कोसळली. इतर  100 घरांची नुकसानी झाली आहे. 77 लोकांना इतर ठिकाणी हलवण्यात आले होते, अशी माहिती नाईक यांनी दिली.
डिचोली तालुक्यात साळ, मेणकुरे, धुमाशे, आमोणा येथून 34 लोकांना स्थलांतरीत करण्यात आले होते. पाणी ओसरल्यामुळे लोक आपापल्या घरात परतले. काहीजण नातेवाईकांच्या घरी गेल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर गोव्यातून सुमारे 600 लोकांना स्थलांतरीत करण्यात आल्याचे सांगून गोव्यात जेवढी नुकसानी झाली आहे त्यांना भरपाई देण्यासाठी केंद्राकडून 100 कोटी अथवा जेवढी नुकसानी झाली आहे तेवढी रक्कम मागितली जाईल, अशी माहिती नाईक यांनी यावेळी दिली.
केंद्राकडून निधी मागण्यासाठी गोव्यातून शिष्टमंडळ येण्याची आवश्यकता नाही. प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे आपण मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.