गोव्यात वर्षातुन फार तर दोन-चार दिवस पारा 20 च्या खाली उतरतो. अगदीच हाइट झाली तर 17 पर्यंत जातो. तेवढीच काय ती थंडी. बाकीच्या वेळी पारा 30 च्या वरच मुक्काम ठोकुन असतो त्यामुळे हिमालयातील बर्फाची दुनिया नेहमी खुणावत असते.त्यातूनच गेली 3 वर्षे सतत न चुकता हिमाचल गाठत तेथील थंडीची मजा लुटायला आवडू लागले.यंदा देखील जानेवारीत स्नो फॉल अनुभवला त्याची मजा काही औरच होती…
गेली 2 वर्षे मी हिमाचल मध्ये जाऊन स्नो फॉल एन्जॉय करत होतो.यंदा जेव्हा पुन्हा हिमाचल आणि ते सुद्धा मनाली मध्ये जाणार अस मित्र मंडळींना सांगितल तेव्हा, दरवर्षी एकाच ठिकाणी का जातोस.दूसरी ठिकाण सुद्धा बघ जरा.असे सल्ले मिळू लागले.मात्र त्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा एकदा हिमाचल प्रदेश मधील मनाली गाठायची ठरवल.
मनाली मध्ये जाऊन मला स्नो फॉल एन्जॉय करायचा होता.त्यामुळे स्नो फॉल केव्हा होणार याची शक्यता वर्तवणाऱ्या साइट डिसेंबर पासून चाळू लागलो होतो.स्नो फॉलचे दिवस बघून विमानाची तिकीटे काढायची होती त्यामुळे मनाली मधील हवामानाचा जोरदार अभ्यास सुरु होता.
यंदा नोव्हेंबर पासूनच मनाली आणि एकूणच हिमाचल मध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरु होती.त्यामुळे 10 दिवस मुक्काम केला तर स्नो फॉल नक्की मिळणार याची खात्री होती.
एरव्ही विमानाची टिकिटे 3 महीने अगोदर काढली तर बऱ्यापैकी स्वस्त पडतात.मात्र मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या खालीवर होणाऱ्या प्रकृतीमुळे ते धाडस काही होईना.शेवटी मांडवी वरील तिसऱ्या पुलाच्या कामाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री पर्रिकर बाहेर पडले तेव्हा बिनधास्त विमानाची टिकिटे काढली.मुख्यमंत्र्यांचे दर्शन होताच चिंता मिटली. मुख्यमंत्री घरा बाहेर मंत्रालयात हजेरी लावू लागताच माझा जीव देखील भांडयात पडला. 10 ते 21 जानेवारीचा प्लान ठरवून विमानाची जाती येती तिकीटे काढली.उशिरा तिकीटे काढून देखील तिकीटे बऱ्यापैकी स्वस्त मिळाली.
तिकीट काढल्या नंतर कधी एकदा हिमालय गाठतो अस झाल होत.बॅग भरण्याची कवायत सुरु झाली.बॅगेत बॉडी वॉर्मर,शिमल्यात घेतलेले जॅकेट, हातमौजे,कानटोपी,मफलर,
साध जॅकेट,शूज, सॉक्स आणि कडाक्याच्या थंडीत गर्मी देणारी विविध पेये घेऊन आलो आणि बॅग भरून मोकळा झालो.
9 तारीखची रात्र होईपर्यंत मोबाइल चार्जर,औषध,तिकीटांची प्रिंट, वेब चेक इन झाल की नाही याची उलट तपासणी सुरु झाली.10 तारीखला 5.15 चे विमान होते.रात्री जेमतेम 2 तास झोपलो पण मनासारखा डोळा लागला नाही.2 वाजता उठून आंघोळ केली आणि गरम कपडे अंगावर चढवले.
हिमाचल मधील थंडीत टिकाव लागण्यासाठी 3 ते 4 थराचे कपडे चढवावे लागतात.अंतर्वस्त्र झाली की बॉडी वॉर्मरचे स्पाइडरमैन पद्धतिचे कपडे चढवावे लागतात.मग शर्ट, पँट आणि त्यावर साध जॅकेट घालून बाहेर पडण्यासाठी तयार झालो.3 वाजता टॅक्सी बोलावली होती.तो अगदी डॉट वेळेवर आला.एक हातातली आणि दूसरी सामानाची बॅग घेऊन कार मध्ये बसलो आणि प्रवास सुरु झाला.
दाबोळी विमानतळावर पोचलो. सुरक्षा तपासणी करून आत गेलो.लगेज बॅग जमा केली आणि विमानाची वाट बघत बसलो.
गोवा ते मुंबई आणि मुंबई ते चंडीगढ़ असा विमानाचा 7 तासांचा प्रवास होता.
 सव्वा पाच वाजताचे विमान वेळेत आले.तिकीट काढताना अधिकचे 300 रुपये मोजून खिडकी शेजारची 7 A नंबरची सीट काढली होती.विमान टेक ऑफ होताच रात्रीच्या काळोखात आकाशातुन लुकलुकणारा गोवा बघणे आणि मुंबईत उतरताना सीमेंटच्या जंगलातील पिवळ्याधमक रंगाच्या स्ट्रीट लाइटने न्हाऊन निघणारे रस्ते न्याहाळण्यात वेळ कसा जातो समजतच नाही.पाऊण तासाने हवाई सुंदरी विमान उतरण्यास तयार असल्याची घोषणा करते आणि छोटे खानी प्रवास पूर्ण होतो.
मुंबईत 3 तासांचा ले ओव्हर होता.म्हणजे 6 वाजता पोचलो तरी मुंबई ते चंडीगढ़ विमानासाठी 3 तास वाट बघावी लागणार होती.पण पुढच्या प्रवासाचे विमान दुसऱ्या कंपनीचे असल्याने लगेज बॅग मिळवा,पुन्हा सगळे सुरक्षा घेरे पूर्ण करा,पुन्हा बॅग जमा करा या धावपळीत वेळ भर भर निघुन गेला.जो थोडा फार वेळ होता त्यात चाय नाष्टा केला.विमानतळावरचे चहापाणी ही काय तशी परवडणारी गोष्ट नसते. त्याच पैशात बाहेर कुठेही पोटभर जेवता येईल इतके बिल होते.पण पर्याय नसतो.
पापी पेट का सवाल है। म्हणतात ते खोट नाही.छोटीशी पोटपूजा करून मुंबईहुन चंडीगढ़च्या दिशेने झेंपावणाऱ्या विमानात बसलो.दोन तासांचा प्रवास सुरु झाला.कधी पांढऱ्या शुभ्र ढगांचे पिंजुन ठेवलेले पुंजके तर कधी क्रिस्टल क्लियर आकाशातून मुंगीपेक्षा लहान दिसणारे डोंगर,नद्यांचे पाट बघत बघत वेळ काढत होतो.डोळ्यावर झोप होती.पण जास्तीचे 300 रुपये खर्च करून खिडकीचे तिकीट काढले असल्याने विमानच्या खिडकी मधून दिसणारे सगळे दृष्य डोळे भरून बघत होतो.मध्येच पायलटने घोषणा केली विमानाच्या उजव्या बाजूला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पाहू शकता. मी डाव्या बाजूच्या खिडकी शेजारी बसल्याने मला काही पटेल यांच्या पूतळ्याचे आकाशी दर्शन काही झाले नाही.उजव्या बाजूला बसलेली मंडळी मात्र मोबाइल कॅमेरा सरसावून पूतळ्याचे फोटो,व्हिडीओ काढण्याचा जोरदार प्रयन्त करत होती.त्यांची हालचाल थंडावल्या नंतर आपण त्या पूतळ्या पासून दूर गेल्याची समजूत करून घेत पुन्हा मान खिडकीत घालून बाहेरचा नजारा न्याहाळू लागलो.
यात चंडीगढ़चा दोन तासांचा प्रवास कसा संपला हे समजलच नाही.खिड़कीतून चंडीगढ़ विमानतळावर लैंड झाल्याचे दिसताच हैंड बॅग घेऊन विमाना बाहेर आलो.आता अवघ्या काही तासांचा प्रवास केला की बर्फाच्या दूनियेत पुढचे आठ दिवस काढायचे या कल्पनेनेच अंगावर शहारे येत होते.
विमानतळा वरुन सामानाची बॅग घेऊन बाहेर पडलो तर मनालीचे मित्र कमल लामा यांनी पाठवलेला कारचा चालक वाट बघत होता.विमानतळावर कुल्हड चायचा मॉर्डन गाडा होता.तेथे 50 रुपयाची कुल्हड चाय घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो.
लामा यांनी पाठवलेली कार डिझायर होती.साधारण 12 वाजता आमचा चंडीगढ मधून मनालीच्या दिशेने प्रवास सुरु झाला.पुढचे 10 ते 12 तास कार प्रवासाची कळ सोसली कि बर्फाच्या दुनियेत हरवून जायची स्वप्ने बघत प्रवास करत होतो.कार मधून केलेला प्रवास प्रचंड कंटाळवाणा आणि थकवणारा होता.डिझायर कार मधून मनालीचा प्रवास करण्याची डिझायर माझी त्याच प्रवासात पूर्ण झाली.त्यामुळे पुन्हा चंडीगढ़ ते मनालीचा प्रवास कधीच डिझायर मधून करणार नाही,असा कानाला खडा लावत कसा बसा प्रवास केला.मध्ये एका हवेली मध्ये दुपारची पोटपूजा केली.एकटया माणसासाठी ते जेवण खुप होते.मनाली पासून त्यावेळी दोनशे किलो मीटर अंतरावर होतो तरी थंडी आपला इंगा दाखवत होती.दात कडाकडा वाजायला लागले.हॉटेल मध्ये साध आणून दिलेले पाणी सुद्धा आता फ्रिज मधून काढून दिल्या सारखे लागत होते.दुपारच्या जेवणा नंतर दोन तीन वेळा थांबून चहाचे पेग घेत कसा बसा प्रवास पूर्ण केला.
रात्री साडे अकरा वाजता मनाली मध्ये पोचलो.तोपर्यंत पाठ आणि कंबरड कामातून गेल होते.माझा पहिला मुक्काम हिडिंबा मंदिरा कडून डोंगरावर जाणाऱ्या रस्त्यावर स्प्रिंग हाउस या होम स्टे वजा हॉटेल मध्ये होता.अगदी डोंगराच्या टोकावर असलेल्या या स्प्रिंग हाउसला शोधायला पंधरा मिनिटे गेली.
आसपास सगळीकडे बर्फाची चादर पसरलेली होती.कार मधून उतरताच दात कडाकडा वाजायला लागले.डोंगराच्या माथ्यावर काळोखात फार काही दिसत नव्हतं.शेवटी हॉटेलच्या नंबरवर फोन केला.200 मीटरवर असलेल्या हॉटेल मधून त्याला मी नजरेस पडलो.त्याने आपली 2 माणसे माझ्या बॅगा न्यायला पाठवली. एका बर्फाच्छादीत पायवाटेने 200 मिटर गेल्या नंतर स्प्रिंग हाउस सापडले. एरव्ही 10 नंतर जेवण दिल जात नाही मात्र मला पोचायला उशीर होणार हे अगोदर कळवले असल्याने त्यांनी ऑर्डर देताच गरमागरम चिकन बिर्याणी बनवून आणली.
स्प्रिंग हाउसचा रूम फारच छान होता.रूम मध्ये आलो तर अशी थंडी वाजली कि काही बोलायची सोय नव्हती.
मनाली मध्ये हॉटेलला सेंट्रल हीटर नसतात.तिथे छोटे हीटर 300 रुपये प्रति दिवस या दराने उपलब्ध करून दिले जातात.ऑफ सिझन मध्ये रूम भाडे 500 असले तरी 300 रुपये ज्यादाचे हीटरला द्यावे लागतात.हीटर नको म्हणून पैसे वाचवण्याची सोय नसते. हीटर न घेणे म्हणजे कुडकुडू हालत बेकार करून घेण्याच्या आपत्तीला निमंत्रण देण्यासारखे असते.
रुम मध्ये येऊन अर्धा तास झाला तरी अंगात गर्मी येत नव्हती.हुडहुडी इतकी भरली की आता यापुढे पुन्हा अशा थंडीत कधीच यायच नाही असा विचार देखील मनाला शिवून गेला.बेड वर 3 मोठे जाड जुड रग होते.ते अंगावर आढून घेतले तरी थंडी आवरत  नव्हती.
हा प्राणायाम सुरु असताना बिर्याणी आली.सोबत आणलेल्या रम बरोबर जेवण घेण्यासाठी हीटर समोरुन उठण्याची हिम्मत होत नव्हती.उसने अवसान आणून कसे बसे जेवण उरकले.13 तासांच्या प्रवासाने शरीर थकले होते.डोक देखील दुखायला लागल होते.जास्त विचार न करता झोपायचे असे ठरवले.झोपण्यापूर्वी जास्त ऊब देणारा एखादा मोठा हीटर  मिळेल का याची चौकशी केली.पण हॉटेल मध्ये तसा उपलब्ध नव्हता.स्प्रिंग हाउस हे होम स्टे प्रकारात मोडणारे हॉटेल आहे.शेवटी बाथरुम मध्ये गेलो तर बाथरूमच्या खिडकीला काचे ऐवजी कापडी फडका ठोकलेला आढळला. अरे बाप रे! रिसेप्शनला फोन लावला.तर सगळ्या रूमला अशीच व्यवस्था असल्याचे त्याने सांगितल्या नंतर पुढे काही बोलायची सोय नव्हती.झोपण्यापूर्वी बाथरूमचा दरवाजा लावून घेतला.
झोपता झोपता समोरच्या काचेतून कापूस पिंजून ठेवल्या सारखा  स्नो फॉल जाग येईल तेव्हा नजरेस पडत होता.थंडी प्रचंड होती.तरीही हिम्मत करून बाहेर गेलो आणि व्हिडिओ केला,फेसबुक लाइव्ह केल. मनाली मध्ये पाय ठेवताच स्नो फॉलची झलक बघायला मिळताच सगळा थकवा निघुन गेला.थोडा वेळ टिप टिप होणाऱ्या स्नो फॉलचे दृश्य डोळ्यात साठवून शेवटी झोपी गेलो.एवढ्या थंडीत हीटरची अपेक्षित सोय नसल्याने म्हणावी तशी झोप लागली नाही.
सकाळी 8 च्या सुमारास सूर्याची किरणे खिडकीतून रूम मध्ये डोकावत असल्याचे पाहुन तडक उठालो आणि बाल्कनी मध्ये येऊन बाहेर काय नजारा आहे हे पहायचे ठरवले.
बाहेर आलो तर डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.चारी बाजूला बर्फाची दाट चादर पसरलेली होती.समोरचे डोंगर सुद्धा पांढरे फटक पडले होते.आकाशाकडे झेपावणाऱ्या देवधरांच्या अंगा खांद्यावर देखील बर्फ अडकलेला होता.चार दिवसां पूर्वी झालेल्या स्नो फॉल मधील बर्फ अजुन वितळलेला नव्हता.सगळीकडे किमान फुटभर तरी बर्फ होता.त्यामुळेच रात्री सहन करण्या पलिकडची थंडी जाणवत होती,हे कळून चुकल.सगळ दृश्य बघून डोळ्याच पारण फिटून गेल. आत येऊन गिझरच्या गरम पाण्याने ब्रश करून तोंड धुतल आणि गरमा गरम 2 चहा आणि टोस्ट जाम मागवले. समोरचा नजारा बघत चहाचे दोन पेग रिचवले. त्यामुळे थोडी तरतरी आली.
समोर जो नजारा होता तो आपल्या मित्र आणि परिवारा पर्यंत पोचवण्यासाठी हात शिवशिवत होते.वॉट्स अॅप व्हिडिओ कॉल आणि फेसबुक लाईव्ह करून नजारा सगळ्यांपर्यंत पोचवला. अगदी विदेशात असल्याचा भास भोवतलचा परिसर बघून होत होता.किती फोटो काढले,व्हिडिओ केले त्याला मोजमापच नाही.
दुपार झाली तर कपडे उतरवून आंघोळ करण्याची हिम्मत काही होत नव्हती.पण फ्रेश वाटण्यासाठी आंघोळ आवश्यक असते.सगळी हिम्मत एकवटून कशी बशी आंघोळ उरकली.
दुपारी जेवण मॉल रोडवर कुठल्या तरी हॉटेल मध्ये करायचे ठरवून चालत चालत डोंगर उतरून मॉल रोडवर पोचलो तर खाली वातावरण साफ होत. बर्फवृष्टि फक्त डोंगरावर वरच्या भागात झाली होती.मॉल रोडवर येताच शेरे पंजाब मध्ये जेवण घेऊन सगळीकडे फेर फटका मारला.
मॉल रोड वर फेरफटका मारल्या नंतर कमल लामा आपण नव्याने चालवायला घेतलेल्या आस्था रिसॉर्टकडे घेऊन गेले.मॉल रोड पासून 5 किमी अंतरावर पिरणी म्हणून भाग आहे.माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कन्येचे घर त्याच भागात आहे.एक लोखंडी कम लाकडी पुल ओलांडून पिरणी मध्ये जाव लागत.व्यास नदी ओलांडली कि पिरणी भागात पोचतो.परिसर डोळ्यांचे पारणे फिटेल असाच आहे.ट्राफिक मधून वाट काढत काढत आस्था रिसॉर्ट मध्ये पोचलो.हे रिसॉर्ट 3 इमारतीं मध्ये विभागले आहे.मागे पुढे बर्फाळ डोंगर,आजू बाजूला सफरचंदाच्या बागा,काही अंतरावर असलेल्या हाइड्रो पॉवर प्रकल्पाच्या सायरनचे आवाज नियमित वेळी कानी पडतात.आस्थाचे रुम प्रशस्त आहेत.बाल्कनी मध्ये बसून बर्फाळ डोंगर बघत विस्कीचे पेग रिचवत बसणे किंवा चहाचे पेले रीते करत बसण्याचा अनुभव आल्हाददायक असाच होता.पहिल्या नजरेतच रिसॉर्ट आणि परिसर नजरेत भरला.
दुपारी रिसॉर्टच्या समोर शेकोटी पेटवून ज्याला बॉन फायर म्हणतात चहाचे 10 ते 12 पेग रिचवले. शेकोटी,कानावर मफलर आणि पोटात गर्मी पैदा करणारे पेय घातले नाही तर उघड्यावर बसायची हिम्मत कोणी करू शकणार नाही.त्यातच पावसाचे ढग जमू लागताच वातावरण पूर्ण बदलून गेले.संध्याकाळ होताच ढग आणखी दाट झाले.रिमझिम पण गारठुन टाकणाऱ्या पावसाला सुरुवात होताच लामा यांचा निरोप घेऊन पुन्हा मनाली मध्ये परतलो.वाटेत पावसाची सोबत होती.येऊन मॉल रोडवर उतरलो.
पावसामुळे मॉल रोड चिंब आणि गारेगार झाला होता.थोडा फेरफटका मारून पुन्हा स्प्रिंग हाउस मध्ये जायच ठरवल होत. तितक्यात दुबई मधून मनाली मध्ये जॉन्सन लॉज मध्ये परतलेल्या ललित कुमारला भेटायचे ठरवले.आम्ही पहिल्यांदा हिमाचल मध्ये आलो त्यावेळी ललितची खुप मदत झाली होती.जॉन्सन मध्ये हेडशेफ म्हणून काम करणारा ललित लोकल नॉनव्हेज डिशेस खास बनवून आम्ही उतरलेल्या माउंटन इन हॉटेल मध्ये घेऊन येत असे. आम्हाला माउंटन इन तितके पसंत पडले नाही त्यावेळी आम्ही जॉन्सन लॉज मध्ये गेलो.तेथे अत्यंत माफक दरात त्याने रूम उपलब्ध करून दिली होती.शिवाय चार दिवस मुक्काम होता.त्या दरम्यान खाण्या पिण्याचा एक रुपया देखील त्याने घेतला नव्हता.
मधल्या काळात तो दुबईला 2 वर्ष गेला होता.दुबई वरुन आल्या नंतर तो पहिल्यांदाच भेटणार होता.पठ्याने कार देखील घेतली होती.त्यामुळे त्याला भेटून जायचे होते.त्याने गेल्या नंतर आधी गावरान मटण बिर्याणी आणून दिली.पोट भरलेल होत. मात्र त्याचा आग्रह मोडू शकलो नाही.त्याच्या कार सोबत सेल्फी काढली.एव्हाना त्याचे सकाळच्या सत्रातले काम संपले होते.तो म्हणाला मी सोडतो हॉटेल वर.त्याच्या नव्या कारने स्प्रिंग हाऊस मध्ये आलो.त्याच्यासाठी एक बॉटल, काजू आणि खास गोवन बिबिंका घेऊन गेलो होतो.ते सगळे त्याच्याकडे सुपुर्द केले.त्याला बिबिंका खुप आवडले.थोडा वेळ गप्पा मारून तो पुन्हा आपल्या कामास निघुन गेला.
अंधार पडू लागताच कापूस पिंजून टाकल्या सारखा स्नो फॉल सुरु झाला.हळू हळू जोर पकडत रात्र भर स्नो फॉल सुरु होता.एक हीटर पुरत नव्हता.4 रग घेऊन सुद्धा थंडी आवरत नव्हती.कशी बशी रात्र काढली.त्यात अधून मधून लाइट गुल होत होती.रात्र वैऱ्याची होती आणि कसलीच सोंग समोर चालत नव्हती.
स्नो फॉल बघायची प्रचंड इच्छा होती म्हणून इतक्या लांब आलो होतो त्यामुळे आता रडगाणे गाऊन त्याला अर्थ नव्हता.
सकाळी उठालो तर काय सगळा परिसर पांढरा शुभ्र. जमीन पांढरी, झाडे पांढरी,डोंगर पांढरे,घरे पांढरी.सगळी कडे पांढरी शुभ्र चादर अंथरली होती.पाण्याचे नळ गोठुन गेले होते.सूर्य डोक्यावर येऊन उन तापे पर्यंत नळाला पाणी नाही.त्यामुळे आंघोळ,ब्रश करायचे देखील वांदे.रस्ते बर्फाने भरले कि डोंगरावर गाडया येत नाहीत.त्यामुळे सगळे होते तिकडे अडकुन पडले.कोण बाहेर जाऊ शकत नव्हता कोणी येऊ शकत नव्हता.खर तर आज मला स्प्रिंग हाउस सोडून आस्था रिसॉर्ट मध्ये जायचे होते.पण तो बेत रद्द करून स्प्रिंग हाऊस मधला मुक्काम एका दिवसाने वाढवावा लागला.संध्याकाळ पर्यंत मनसोक्त बर्फ बघत राहिलो. हॉटेल मध्येच जेवणाची ऑर्डर देणार तितक्यात कमल लामा यांचा फोन आला.आज स्नो फॉल मुळे सगळे रस्ते बंद असल्याने आस्था मध्ये जाता येणार नाही.तुम्ही चालत चालत माझ्या घरी जेवायला या.
लामा यांचा आग्रह फारच होता.तो मोडवला नाही.रस्त्यावर बर्फाचा चिखल असतो.वितळलेला बर्फ पाणी बनून वाहत असतो.त्यातरस्त्यावरची माती मिसळली की चिखल होतो.त्यातून चालत चालत लामा यांचे घर गाठायचे म्हणजे मोठे दिव्यच होते.पण स्नो फॉलचा सगळा अनुभव घ्यायचा असल्याने हिम्मत करून बाहेर पडलो.बर्फ जास्त पडला तर जिप्सी कार फक्त येजा करत शकतात.बर्फाळ रसत्यावरुन फिरणाऱ्या गाडयांमुळे रस्ते बघण्यासारखे होतात.त्यातून चालत जाण म्हणजे पायाने धुळवड करत जाण्या सारख असत. या संभाव्य धोक्यांकडे डोळेझाक करत सिगुल रिसॉर्ट शेजारी असलेल्या लामा यांच्या घरी पोचलो.लामा यांच्या घरची मंडळी माझीच वाट बघत होती.गरमा गरम सुप प्यायला देऊन माझ स्वागत झाल.मी त्यांच्या साठी काजू,बिबिंका आणि काजू फेणीची बॉटल त्यांना दिली.
सगळेजण एका चिमणी भोवताली मांडी घालून जेवायला बसलो.चिमणी मध्ये लाकड पेटवली जात असल्याने बाहेर 2 फुट बर्फ असून देखील घर उबदार बनले होते.इतक उबदार की काही वेळातच मला जैकेट काढून बसाव लागल.नेपाळी पद्धतीचे चिकन आणि भात असा मेन्यू होता.वेगळी नेपाळी चव चाखून थोडा बाहेर आलो तर पुन्हा रिमझिम रिमझिम बर्फवृष्टि सुरु झाली.
मॉल रोड जवळ स्नो फॉल सुरु झाला होता.तेवढयात एबीपी मधून अविनाशने फोन करून मनाली मधील स्नो फॉलचा वॉक थ्रू करायला सांगितला.आता आली पंचायत.वॉक थ्रू करायला कॅमरामन लागतो.तो कुठून आणायचा. लामा यांचा मुलगा गोपी मोबाईल सॅव्ही आहे.त्याला घेऊन सिगुल रिसॉर्टच्या परिसरतात गेलो.एबीपीला जशी दृश्य हवी होती तसा नजारा सगळी कडे होता.ढोपरभर बर्फात कुडकुडत वॉक थ्रू करताना शब्द फुटत नव्हते.3 वेळा रिटेक करून एक वॉक थ्रू पाठवला.सोबत गोपी बर्फात खेळत असताना व्हिडिओ पाठवला.बातमी लगेच चालली. त्याच वेळी उत्तर भारतात सगळीकडे तूफान स्नो फॉल सुरु होता.आयता रिपोर्टर मनाली आहे तर एबीपी संधी कशी सोडेल.
वॉक थ्रू करून मॉल रोडवर गेलो.तिकडे तर पर्यटक स्नो फॉलचा आनंद लूटत होते.सेल्फी,फोटो,फेसबुक लाइव्ह सगळ सुरु होत. काहीनी बर्फाचे स्नो फॉलचे हमारे दिल में मनाली रहता है। असा आशय लिहून एक स्मारक बनवले होते.मॉल रोडवर बर्फाची चादर पसरली होती.त्यावरून चालताना चांगलीच कसरत करावी लागत होती.पाय व्यवस्थित लागला नाही तर मोटला खाली पडला म्हणून समजायच.बर्फाळ मॉल रोडवर मन भरे पर्यंत फेरफटका मारून दमल्या नंतर 200 रूपयांची रिक्शा करून स्प्रिंग हाऊस गाठले.
खाली जेवढा स्नो फॉल होता त्याच्या चारपट बर्फ डोंगरावर पडला होता.पारा मायनस 15 पर्यंत गेला होता.रात्री पुन्हा स्नो फॉल झाला तर पारा आणखी खाली उतरणार होता.
आणि झाले ही तसेच.सकाळी उठलो तर बर्फाचे थर आणखी उंच झाले होते.नळ तर गारठुन गेले होते.त्यामुळे आंघोळीचा प्रश्नच नव्हता.रात्र भर बत्ती गुल होती.दुपारी सूर्य डोक्यावर आला त्यावेळी बर्फ वितळून होणारे पाणी काचे सारखे होऊन गोठलेले दिसत होते.त्यातून नवीनच कलाकृती तयार झाली होती.उन्हात बर्फ वितळून रस्ता खुला झाला तेव्हा स्प्रिंग हाऊस मधील मुक्काम हलवण्याचे ठरवले. पॅकिंग करून लामा यांच्या घरी गेलो.तिकडून आस्था रिसॉर्ट गाठले.
आस्थाच्या परिसरतात देखील बर्फाची चादर पसरली होती.गेल्या गेल्या सामान रूम मध्ये ठेवून चायचे प्याले हाती घेतले.दुपारी हॉटेल मध्ये बसून जेवायच्या ऐवजी बाहेर शेकोटी पेटवून बर्फात बसून बिर्याणी खल्ली. पुढचे 3 दिवस आस्था मध्ये बसून मनालीचे बर्फा मधले सौदर्य न्याहाळत बसलो.हॉटेलच्या रूमच्या बाल्कनी मधून दिसणारे बर्फाळ डोंगर,त्यावर चालणारा सूर्याच्या किरणांचा सोनेरी खेळ आनेकडा डोळे भरून बघत बसायचो.कॅमेरात साठवून ठेवायचो.
3 दिवस मनाली मधील बर्फाळ दुनिया अनुभवल्या नंतर एक दिवस अगोदर चंडीगढ़ कडे प्रयाण केले.कारण हवा पुन्हा खराब होऊ लागली होती.पुन्हा जोरदार स्नो फॉल होईल असा इशारा हवामान खात्याने दिला होता.त्यामुळे थोडा सन्नी दिवस मिळताच बस पकडून चंडीगढ़ गाठले.रात्रीचा प्रवास कसा झाला आणि केव्हा चंडीगढ़ मध्ये पोचलो हे समजले सुद्धा नाही.चंडीगढ़ मध्ये दोन दिवस फेरफटका मारला.रॉक गार्डन बघितल,मार्केट बघितल,मॉल फिरलो.पाल धाब्यावर पंजाबी खाना खाल्ला.
दीड दिवस चंडीगढ़ मध्ये फिरून परतीचा प्रवास सुरु केला.चंडीगढ़हुन दिल्ली मार्गे गोवा फ्लाइट होती.कनेक्टिंग फ्लाइट एकाच कंपनीची नव्हती.त्यामुळे बरीच धावपळ झाली.शक्यतो कनेक्टिंग फ्लाइट एकच असेल असे बघून प्रवास करावा, हे मी शिकलो.सामान काढा,पुन्हा चेक इन करा असा द्रविडी प्राणायाम करावा लागला.मध्ये वाटत होते आता वेळेत पोचू शकणार नाही आणि फ्लाइट मिस होणार.कारण चंडीगढ़ मधून फ्लाइट सूटायला 45 मिनिटे उशीर झाला होता.त्यात मधल्या उठाठेवी करे पर्यंत बराच वेळ गेला.प्रचंड धावपळ केली.शेवटी एकदाचा पोचलो वेळेत. त्यानंतर जीव भांडयात पडला.दिल्लीत बसून गोव्यात उतरलो.
मनात थंडी होती मात्र वातावरणात उकडा होता.हा उकडा आता जॅकेट काढून ठेव,तू गोव्यात पोचलास असे सूचवत होता.टॅक्सी करून घरी पोचलो.लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर होत्या.पर्रिकर यांची तब्बेत देखील चिंताजनक बनत चालली होती.कामाच्या व्यापात मनात  साठवून ठेवलेल्या बर्फाळ आठवणी केव्हा वितळून गेल्या समजले सुद्धा नाही.आता पुन्हा जानेवारी केव्हा येतो आणि परत कधी बर्फाच्या दुनियेत जातो असे झाले आहे….