पुजारा ,रहाणेचा डबल धमाका,श्रीलंकेची अडखळत सुरुवात

0
1177

चेतेश्वर पुजाराने आपले शतकाचे लक्ष्य पुन्हा एकदा अचूक साधले आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नाबाद १२८ धावांची खेळी केली. विशेष म्हणजे हा त्याचा ५० वा कसोटी सामनाही आहे. पुजाराला साथ लाभली अजिंक्य रहाणेची. अजिंक्यने आपल्या कसोटी कारकीर्दीतील नववे शतक झळकावताना १०३ धावांची नाबाद खेळी केली. शिवाय, त्याने पुजारासह चौथ्या विकेटसाठी २११ धावांची अभेद्य भागीदारीही रचली. दोघांच्या या शतकी खेळींमुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवशी ३ बाद ३४४ धावांपर्यंत झेप घेतली होती.

पुजाराने नेहमीच्या शैलीत संयमी फलंदाजी करताना २२५ चेंडूंत १० चौकार व एका षटकारासह ही शतकी खेळी साकारली. रहाणेने त्या तुलनेत आक्रमक होत १६८ चेंडूंत आपले नववे शतक झळकाविले. त्याच्या या शतकी खेळीत १२ चौकारांचा समावेश होता.

पुजाराचे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील हे सलग दुसरे शतक होते. या शतकासह त्याने कसोटीतील ४ हजार धावांचा टप्पाही पार केला. गेल्या काही कसोटी सामन्यांत त्याने १७, ९२, २०२, ५७ आणि १५३ अशा धावा केलेल्या आहेत. ५०व्या सामन्यात शतक ठोकणारा तो सातवा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी, पॉली उम्रीगर (१९६१), गुंडाप्पा विश्वनाथ (१९७९), कपिल देव (१९८३), व्हीव्हीएस लक्ष्मण (२००४) आणि विराट कोहली (२०१६) यांनी अशी शतके झळकाविली आहेत.