पीएसएलव्ही-सी 46 द्वारे रिसॅट-2 बी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

0
693

 

गोवा खबर : आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी 46 या यानाद्वारे रिसॅट-2 बी या उपग्रहाचे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.पहाटे साडेपाच वाजता यानाचे प्रक्षेपण झाले आणि उड्डाणानंतर सुमारे 15 मिनिटे 25 सेकंदांनी यानाने 556 किलोमीटरवर कक्षेत रिसॅट-2 बी उपग्रह सोडला.

रिसॅट-2 बी  उपग्रहाचे वजन 615 किलोग्रॅम असून, शेती, वन्यक्षेत्र आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रात तो सेवा देणार आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी मोहिमेत सहभागी सर्वांचे अभिनंदन केले आहे. 3.6 मीटर रेडिअल रिब ॲण्टेनासह प्रगत तंत्रज्ञान असलेला हा प्रगत पृथ्वी निरिक्षण उपग्रह असल्याचे सिवन यांनी सांगितले.

नागरिकांसाठी खुल्या असलेल्या प्रेक्षागृहातून 5 हजार खगोलप्रेमींनी या प्रक्षेपणाचा आनंद घेतला.इस्रो आता चंद्रयान-2 च्या प्रक्षेपणासाठीच्या प्रयत्नांना गती देत आहे. 9 जुलै ते 16 जुलै 2019 दरम्यान चंद्रयान-2 प्रक्षेपित केले जाणार असून, 6 सप्टेंबर 2019 ला ते चंद्रावर उतरणे अपेक्षित आहे.