पारंपारिक आरोग्यपूर्ण जीवनशैली नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचे ध्येय: श्रीपाद नाईक

0
970

गोवा:जुन्या पिढीने आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगिकारल्याने वैद्यकीय उपचार घेण्याची गरज पडत नव्हती; ही भारतीय पारंपारिक जीवनशैली नवीन पिढीने आत्मसात करावी, हा आमचा उद्देश आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी आज पणजी येथे केले. गोवा टपाल विभागाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय आयुष टपाल तिकीट महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

 

आपली पारंपारिक आरोग्यपूर्ण जीवनशैली बदलल्यामुळे आपले आरोग्य बिघडलेच शिवाय निसर्गावरही आपण अत्याचार केल्याने त्याचेही चक्र बिघडले आहे. यातून धडा घेऊन आपण वेळीच योग्य आहार, विहार अवलंबिला तर आरोग्यपूर्ण जीवन जगू शकू, अशी आशा नाईक यांनी यावेळी व्यक्त केली.

 

दिवाळी असूनही शाळा व विद्यार्थ्यांनी महोत्सवाला दिलेला भरगोस प्रतिसाद पाहून आनंद व समाधान झाल्याचे नाईक यांनी यावेळी सांगितले; तसेच सहभागींचे आभारही मानले. टपाल विभागाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये 5000 हून अधिक विद्यार्थी व 150 शाळा सहभागी झाल्याबद्दलही त्यांनी कौतुक केले. महोत्सवाच्या निमित्ताने टपाल तिकिटांच्या माध्यमातून तरुणांना औषधी वनस्पती, निरोगी जीवन, निसर्ग याकडे आकर्षित करून काही प्रमाणात जरी या विषयाकडे वळवू शकलो तर समाधान वाटेल, अशी भावना नाईक यांनी व्यक्त केली. नव्या पिढीला आम्ही ज्या गोष्टी देऊ इच्छितो, त्या या महोत्सवाच्या माध्यमातून देण्याचा यशस्वी प्रयत्न झाल्याने समाधानी असल्याचे नाईक यांनी सांगितले.

 

गोवा टपाल विभागाने आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने दोन दिवसीय आयुष टपाल तिकीट महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाचा समारोप आज पणजी येथे झाला. या प्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक, आयुष मंत्रालायचे सह सचिव रणजीत कुमार, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या संचालिका डॉ. के सत्यलक्ष्मी, गोवा क्षेत्राचे पोस्ट मास्टर जनरल डॉ. विनोद कुमार तसेच गोवा टपाल विभागाच्या वरिष्ठ अधीक्षक अर्चना गोपीनाथ उपस्थित होत्या.

 

या कार्यक्रमात सहा विभागात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या शाळा व विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.