पाकप्रेमी मिकाला मनसेचा इशारा

0
988

व्हिडिओ टि्वटरवरून ‘चला भारत आणि आपल्या पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करू या,’ असं आवाहन करणाऱ्या प्रसिद्ध गायक मिका सिंगला मनसेने दमच भरला आहे. ‘अमेरिकेत हमारा पाकिस्तान कॉन्सर्ट करतोस. आता महाराष्ट्रात माईक तर पकडून दाखव,’ असा इशारा मनसेने मिकाला दिला आहे.

पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचं आवाहन करणारा मिकाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला टि्वटरवर ट्रोलरने चांगलेच झोडपून काढलेले असतानाच मनसेचे नेते अमेय खोपकर यांनीही टि्वट करून मिकाला महाराष्ट्रात कार्यक्रम घेऊन दाखविण्याचे आव्हान केले आहे. ‘मिका, आता महाराष्ट्रात माईक पकडून दाखवच,’ असं ट्वीट अमेय खोपकर यांनी केलं आहे. त्यामुळे मिकाला महाराष्ट्रात कार्यक्रम करणं आगामी काळात डोकेदुखी ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

येत्या १२ आणि १३ ऑगस्टला अमेरिकेत शिकागो आणि ह्युस्टन इथे मिकाचा कार्यक्रम होणार आहे. या कॉन्सर्टपूर्वी मिकाने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ‘हमारा हिन्दुस्तान १५ अगस्त को आजाद हुआ था और १४ को हमारा पाकिस्तान आजाद हुआ था,’ असं मिका या व्हिडीओत म्हणाला. या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत शोचा पाकिस्तानी प्रमोटरही होता. मिकाचं ‘हमारा पाकिस्तान’ म्हणणं खटकल्यानेच मनसेने मिकाला हे आव्हान दिलं आहे. तर मिकाच्या या टि्वटला उत्तर देताना नेटीजन्सने त्याच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे. दरम्यान, खोपकर यांच्या टि्वटवर मिकाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.