पाकिस्तानने आज पहाटे पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. जम्मू-काश्मीरमधील मेंढर क्षेत्रात पाकिस्तानने अंदाधुंद गोळीबार केला. यात एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. याव्यतिरिक्त रात्री कुपवाडा जिल्ह्यातल्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यात लष्कराचा एक जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे.

आज पहाटे ५.३५ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला केला. यात एका घराचे नुकसान झाले आणि एका महिलेचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री कुपवाडा जिल्ह्यातल्या कालारुस भागातल्या वनक्षेत्रात असलेल्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. लष्कराने दहशतवाद्यांचा कडवा प्रतिकार केला. यात एक जवान जखमी झाला आहे.

दरम्यान, खोऱ्यातल्या त्राल भागात संरक्षण दलाने पुन्हा शोधमोहीम सुरू केली आहे. यापूर्वी मंगळवारी जम्मूच्या पूँछ भागातील कृष्णा खोऱ्यात पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. यात एक सैनिक शहीद झाला होता.