पहिल्या जीआय स्टोअरचे गोवा विमानतळावर उद्घाटन

0
1352

 

भारतातील सर्व विमानतळावर उभे राहणार जीआय स्टोअर : केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू

 

गोवा खबर:‘सध्या देशात २७० जीआय नोंदणीकृत उत्पादने आहेत. अशा उत्पादनांना बाजारपेठ तसेच देशी-विदेशी ग्राहक मिळविण्यासाठी जीआय स्टोअर अर्थात भांडार सुरु करण्याची कल्पना समोर आली आहे. गोव्यातून याची सुरुवात होत असून सध्या देशातील सर्व म्हणजे १०१ विमानतळांवर अशी भांडारे सुरु करण्यात येणार आहेत. तसेच पुढील काळात सुरु होणाऱ्या नवीन १०० विमानतळांवर देखील ही भांडारे उभी राहतील, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग तसेच नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभु यांनी आज दिली.

दाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतातील पहिले भौगोलिक संकेत (जीआय) भांडाराचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. जागतिक पर्यटकांसाठी हे स्टोअर एक वरदान असेल, ही दुकाने स्थानिक उत्पादने, हस्तशिल्प आणि भौगोलिक प्रतिभा यांना प्रोत्साहन देतील. गोव्याची फेणी जीआय उत्पादनांपैकी एक आहे आणि मानकुर्द आंबा हे एक स्थानिक वैशिष्ट्य आहे, अशा वैशिष्ट्यांना घेऊन ही संकल्पना काम करणार आहे. विमानतळावर स्थानिक उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी एएआय लवकरच देशातील सर्व राज्य सरकारांसोबत करार करणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

 

बचत गट, कारागीर आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनांना सवलत दराने विमानतळावर प्रदर्शित केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. वाणिज्य मंत्रालयाने आधीच विदेशी व्यापार चळवळीसाठी प्रस्ताव मांडला आहे. जर जगभरातील व्यापार चळवळ आमची उत्पादने प्रदर्शित करण्यास सहमत असतील तर ग्रामीण क्षेत्रासाठी ते खूप फायदेशीर ठरेल. जपान, कोरिया सारखे देश आधीपासूनच आमच्या समुद्री उत्पादनांना त्यांच्या विमानतळांवर ठेवण्यास सहमत आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की भविष्यात सर्व जीआय स्टोअर, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइनने तयार केलेल्या एकाच डिझाइने उभारण्यात येतील. आमच्याकडे एक अतिशय समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. म्हणूनच, आमचा सर्व सांस्कृतिक संग्रह लवकरच संगणकीकृत केला जाईल आणि सामान्य जनतेस उपलब्ध केला जाईल, असे आश्वासन प्रभु यांनी यावेळी दिले.

 

भारत सरकार, गोवा सरकार, भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय), काजू एक्सपोर्ट प्रमोशनल कौन्सिल ऑफ इंडिया (सीईपीसीआय), भारत स्पाईसेस बोर्ड, एपीडा, भारत टी बोर्ड यांनी संयुक्तपणे या भांडाराची सुरुवात केली आहे. संसद सदस्य नरेंद्र सावईकर व विनय तेंडूलकर यावेळी उपस्थित होते.