पर्रीकर यांची स्वप्ने सरकार पूर्ण करेल:मुख्यमंत्री

0
641
 गोवा खबर: राज्य सरकार माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी आखून दिलेल्या मार्गावरच चालणार आहे. त्यांनी राज्याच्या विकासाची पाहिलेली स्वप्ने हे सरकार पूर्ण करेल असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले. सांगे येथे भाजप कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते.
ते म्हणाले, सरकारचा कारभार हाकत असताना पर्रीकर आमच्यातून निघून गेले असले तरी उर्वरीत तीन वर्षे हे सरकार पर्रीकर सरकारचा वारसा पुढे चालवणार आहे. दोन वर्षे पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकार होते आताही हे पर्रीकर यांचेच सरकार असेल. त्यांनी विकासाची दृष्टी आम्हाला दिली, त्याच मार्गावर सरकारची वाटचाल असेल. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे लोकप्रिय उमेदवार  नरेंद्र सावईकर यांना गेल्या निवडणुकीत सांग्यातून आठ हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते, यात यंदा आणखीन वाढ करावी.
सरकारमध्ये गोवा फॉरवर्ड व अपक्ष आहेत. मगो सरकारमध्ये होता. त्यांचे दोन आमदार स्वतःहून आमच्याकडे आले. आम्हाला त्यामुळे मगोच्या एका मंत्र्याला मंत्रिमंडळातून वगळावे लागले. मगोचा आताचा कारभार पाहून या पक्षाचे नेते स्व. भाऊसाहेब बांदोडकर हे जिथे असतील तिथे अश्रू ढाळत असतील. आम्ही आघाडी फोडली नाही. मगोच्या नेत्यांना गोव्याच्या विकासात रस नव्हता. ते स्वार्थाने बरबटलेले होते. आम्ही राज्याचे व जनतेचे हित पाहून निर्णय घेतो. आमच्यासाठी राज्याचे हित सर्वोच्च त्यानंतर पक्षाचे हित असते. आता मगोने कॉंग्रेसशी हातमिळवणी केली आहे. कॉंग्रेसला मतदान करा असे मगोचे नेते सांगत आहेत. असे यापूर्वी कधी घडलेले नव्हते. जनता हे आताच का हे ओळखून आहे आणि जनताच मगोच्या या नेत्यांना निवडणुकीत धडा शिकवणार आहे.
आपण पक्षाचा कार्यकर्ता ते मुख्यमंत्री असा प्रवास केला आहे.कॉंग्रेस अशा कोणत्याही कार्यकर्त्याला मुख्यमंत्रीपदापर्यंत येऊ देणार नाही, असे नमूद करून ते म्हणाले, माझे वडील आमदार वा खासदार नव्हते.ते पक्षाचे सामान्य कार्यकर्ते होते. मी मुख्यमंत्रीपदाचा एक महिनाही पूर्ण करायचा आहे. आम्हाला पर्रीकर यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यांनी आम्हाला सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. ते आज असते तर पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच हवेत असे त्यांनी आम्हाला सांगितले असते.  त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही राज्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपला जिंकून देऊया.
खाणी बंद असल्याने जनतेला नेमके कोणते त्रास होत आहेत याची मला कल्पना आहे. माझ्या मतदारसंघातील बहुतांश भाग खाणव्याप्त आहे. माझे वडिल चौगुले कंपनीत मशिन ऑपरेटर होते. त्याचमुळे खाणी बंद पडल्यानंतर कुटुंबावर कोणते संकट कोसळते याची माझ्याशिवाय चांगली कल्पना कोणाला येऊ शकत नाही असे सांगून ते म्हणाले, खाणप्रश्नी मार्ग काढण्यासाठी काही दिवस द्या. आम्ही उपाय शोधत आहोत. केवळ भाजपचेच सरकार हा प्रश्न सोडवू शकते.
संजीवनी साखर काऱखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्या समस्या झेलाव्या लागतात याची मला कल्पना आहे. सांग्यात मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकरी आहेत. संजीवनी साखऱ कारखान्याची समस्या दूर करण्यासाठी नेमके काय करणार हे आताच सांगत नाही पण ही समस्या राहणार नाही एवढेच आश्वासन आता देतो असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री म्हणाले, सरकारी क्षेत्रात आठ ते दहा हजार तर खासगी क्षेत्रात वीस ते तीस हजार रोजगारसंधी सरकार निर्माण करेल. बेरोजगारी हा सर्वसामान्यांना भेडसावणारा प्रश्न आहे याची सरकारला कल्पना आहे. खाणी सुरु असेपर्यंत आम्हाला ही समस्या जाणवली नव्हती. त्यामुळे येत्या तीन वर्षात आम्हाला मनुष्यबळ विकासावर भर द्यावा लागणार आहे. करिअर शिक्षण ते रोजगार असा हा प्रवास असेल.