पर्रिकर यांचे कार्य सर्वदूर पोचवण्यासाठी एक मनोहर कथा पुस्तक लिहिले : मंगला खाडीलकर

0
347
गोवा खबर : गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा देशाचे माजी संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या जीवनावर नवचैतन्य प्रकाशन मुंबई आणि भाजप गोवाच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित प्रख्यात निवेदिका मंगला खाडिलकर यांनी लिहिलेल्या ’एक मनोहर कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्या बुधवार दि. 17 रोजी होणार आहे.
स्व. मनोहर पर्रीकर यांच्या द्वितीय पुण्यतिथीचे औचित्य साधून येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रांगाझा सभागृहात दि. 17 रोजी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट-तानावडे यांनी दिली. भाजपच्या येथील मुख्यालयात घेतलल्या पत्रकार परिषदेला पुस्तकाच्या लेखिका मंगला खाडिलकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
शेट-तानावडे म्हणाले, गोमंतकातच नव्हे तर देशात भाई म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्व. मनोहर पर्रीकर यांच्या संपूर्ण जीवनाचा लेखाजोखा या पुस्तकात मांडला आहे. मंगलाताईंनी अत्यंत परिश्रम करून भाईंच्या सामाजिक, राजकीय जीवनाचा सारिपाट या पुस्तकरुपाने समोर आणला आहे. भाईंचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग आणि भव्य होते. आमदारपदापासून सुरू झालेली त्यांची कारकिर्द देशाच्या संरक्षणमंत्रीपदापर्यंत पोहोचली.
मुख्यमंत्री असो किंवा विरोधी पक्षनेते प्रत्येक पदाला त्यांनी उत्तम न्याय दिला. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी त्यांनी केवळ विधानसभाच नव्हे तर संरक्षणमंत्री असताना संसदही गाजवली. सरकारी अधिकारीच नव्हे तर विरोधी पक्षातील नेते मंडळीही त्यांना विचारपूर्वक प्रश्‍न करायचे. भाईंविषयी सर्वंकष माहिती या पुस्तकात देण्यात आली असल्याचे सदानंद शेट- तानावडे यांनी यावेळी दिली.
मंगला खाडिलकर पुस्तकाविषयी म्हणाल्या, या पुस्तकाचा विचार 2006 मध्येच डोक्यात आला होता. अनेक कार्यक्रमांसाठी मी गोव्यात यायचे. त्यावेळी मी अत्यंत जवळून पाहिलेल्या प्रतिभाशाली व्यक्तीपैकी मनोहर भाई हे एक होते. त्यामुळे त्यांच्या जीवनावर पुस्तक लिहावेसे वाटले. पण त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे विलंब झाला. गेली दीड ते दोन वर्षे केवळ गोवाच नव्हे तर भाईंचा देशातील ज्या-ज्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांचा संबंध आला अशा अनेकांना मी भेटले. पर्रीकरांविषयी लिहितोय म्हटल्यावर सर्वत्र माझे आनंदाने स्वागत झाले. तसेच चांगले सहकार्यही मिळाले. या कामी मला गोवा भाजप, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकारांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ता, आमदार, विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री आणि संरक्षणमंत्री म्हणून पर्रीकर काय होते, याची माहिती या पुस्तकात समाविष्ठ केली आहे. प्रत्येक पातळीवर त्यांनी केलेले कार्य सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी हे पुस्तक लिहिले असल्याचे मंगला खाडिलकर म्हणाल्या.